तासगावात बेदाणा सौद्यास ५१ दिवसांनंतर सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:21 AM2021-06-04T04:21:15+5:302021-06-04T04:21:15+5:30
तासगाव : कोरोनाच्या लाटेत लॉकडाऊनमुळे तब्बल ५१ दिवस बंद असलेले बेदाण्याचे सौदे गुरुवारपासून सुरू झाले. राष्ट्रवादीचे नेते रोहित ...
तासगाव : कोरोनाच्या लाटेत लॉकडाऊनमुळे तब्बल ५१ दिवस बंद असलेले बेदाण्याचे सौदे गुरुवारपासून सुरू झाले. राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर बेदाणा सौदे सुरू करण्यात आले. गुरुवारी सौद्यासाठी बाजार समितीत ५४० टन बेदाण्यांची आवक झाली, तर ३२९ टन विक्री झाली.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत लॉकडाऊनमुळे बेदाण्यांचे सौदे बंद करण्यात आले होते. तब्बल ५१ दिवस बेदाणा सौदे बंद होते. बेदाणा सौदे सुरू करण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, रोहित पाटील, बाजार समितीचे सभापती अजित जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीनंतर रोहित पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सौदे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून गुरुवारी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बेदाणा सौदे घेण्यात आले. २३ अडत दुकानांत सौदे निघाले. हिरव्या बेदाण्यास किलोला १२५ ते २२० रुपये, पिवळ्या बेदाण्यास १०५ ते १७५ रुपये, काळ्या बेदाण्यास ३५ ते ८६ रुपये असा दर मिळाला.
बेदाण्याच्या सौद्यांवेळी बाजार समितीचे सभापती अजित जाधव, उपसभापती धनाजी पाटील, संचालक कुमार शेटे, भूपाल पाटील उपस्थित होते.