सांगली, तासगावमधील बेदाणा सौदे महिनाभर बंद, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 17:40 IST2024-10-11T17:39:59+5:302024-10-11T17:40:14+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंट हा उपक्रम राबवला आहे

सांगली, तासगावमधील बेदाणा सौदे महिनाभर बंद, कारण..
सांगली : बेदाणा शून्य पेमेंटसाठी गुरूवार, दि. १७ ऑक्टोबरपासून एक महिना बेदाणा सोदे बंद करण्यात येणार आहेत. व्यापारी आणि आडत्यांनी वर्षभर व्यवसाय केल्यानंतर त्यांचे पैशाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी दिवाळीमध्ये एक महिना बेदाणा सौदे बंद ठेवले जात आहेत, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी दिली.
राजेंद्र कुंभार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणा उद्योगामध्ये पैशाचे व्यवहार व्यवस्थित व्हावेत. आडते आणि व्यापाऱ्यांचे पैसे एकमेकांना वेळेत मिळाले पाहिजेत. तसेच शेतकऱ्यांनाही पैसे वेळेत मिळाले पाहिजेत. कुणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंट हा उपक्रम राबवला आहे. या शून्य पेमेंटमध्ये हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या बेदाणा उद्योग विश्वामध्ये कोणता व्यापारी कोठे आहे, तो फसवणूक तर करत नाही ना?, याचा प्रत्यय अनेकवेळा या शून्य पेमेंटच्या उपक्रमामध्ये आला आहे.
शून्य पेमेंट उपक्रमामुळे कोणत्या खरेदीदाराला किती माल द्यायचा, त्याची कुवत काय आहे हे ओळखण्यास मदत झाली आहे. असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दि. १७ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी व सौदे बंद राहतील. संचालकांच्या बैठकीला अध्यक्ष राजू कुंभार, उपाध्यक्ष संजय बोथरा, सचिव राजू माळी व सर्व संचालक उपस्थित होते.
थकबाकीदार व्यापाऱ्याला सौद्यात बंदी : राजेंद्र कुंभार
शून्य पेमेंट करणे, ठरल्याप्रमाणे आडत्यांना ४० दिवसांत पेमेंट देणे, पुढील तारखेचे धनादेश देऊ नयेत, शून्य पेमेंट न केल्यास त्या व्यापाराला सौद्यामध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर सौदे चालू करण्यापूर्वी असोसिएशनची सर्वसाधारण बैठक घेण्यात येईल, असेही राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.