सांगलीतील बेदाणा सौदे आता 'या' ठिकाणी होणार; काही व्यापाऱ्यांचा विरोध
By अशोक डोंबाळे | Published: October 28, 2023 06:38 PM2023-10-28T18:38:04+5:302023-10-28T18:40:42+5:30
सावळी येथील साडेतेरा एकर जमीन खरेदीसाठी सुमारे १३ कोटी रुपये व ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च बाजार समिती प्रशासनाने केला
सांगली : येथील मार्केट यार्डातील बेदाणा सौदे सावळी (ता. मिरज) येथे हलविण्यात येणार आहेत. सौद्याचा हॉल असोसिएशन बांधणार असून महिनाभरात सर्व काम करून सावळीला सौदे घेऊन जाण्याचे बेदाणा असोसिएशन आणि सांगलीबाजार समितीचे नियोजन आहे. त्यादृष्टीने बेदाणा व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली आहे; पण दुसऱ्या गटाची नाराजी असल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने सोमवारी पुन्हा बैठक बोलाविली आहे.
सावळी येथील साडेतेरा एकर जमीन खरेदीसाठी सुमारे १३ कोटी रुपये व ती जागा विकसित करण्यासाठी पाच कोटी रुपये खर्च बाजार समिती प्रशासनाने केला आहे. या वादग्रस्त जागेबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी बाजार समितीसाठी योग्य नाही. उच्चदाब वीज वाहिनी असल्यामुळे जागा विकसित करण्यासाठी अडचणी येणार आहेत, असा ठपकाही चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. या परिस्थितीमध्येही सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला कशासाठी आणि कुणाच्या स्वार्थासाठी हलविले जात आहे, असा आरोप काही बेदाणा व्यापाऱ्यांनी केला आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला हलविण्याची गरज नाही. सांगलीतील बेदाणा सौद्याची जागा शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी सोयीची आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये बेदाणा सौदे सावळीला हलवू नये, अशी भूमिका बहुतांशी बेदाणा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेतली आहे. दुसऱ्या बाजूला काही मोठ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी सांगलीचे बेदाणा सौदे सावळीला घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे तर बेदाणा सौद्यासाठी शेडसह तेथील मूलभूत सुविधा असोसिएशनतर्फे करण्याचीही त्यांनी तयारी ठेवली आहे. या खर्चालाही बेदाणा असोसिएशनच्या काही पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.
व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी सावळीला सौदे : सुजय शिंदे
सांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौद्याची जागा अपूर्ण आहे. म्हणून बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खर्च करून सावळीला सौदे घेऊन जाण्याची तयारी ठेवली आहे. काही व्यापाऱ्यांचा विरोध आहे. या व्यापाऱ्यांची सोमवारी बैठक घेऊन त्यांचीही भूमिका जाणून घेतली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी दिली.