ढगाळ हवामानाने बेदाणा उत्पादक हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:11 PM2022-03-21T16:11:51+5:302022-03-21T16:12:32+5:30
परतीच्या मुसळधार पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचल्याने घड कमी सुटले आहेत. घडाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
संख : ढगाळ वातावरण आणि उष्म्यामुळे जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. रॅकवर टाकलेला बेदाणा काळा, चिकट, मऊ, कलर धीम होत आहे. शायनिंग कमी होते. यातच अवकाळी पाऊस झाला तर द्राक्ष बागायतदारांच्या अडचणी वाढणार आहेत.
तालुक्यात ११ हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. पूर्व भागात उच्च प्रतिच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बेदाण्याची निर्मिती होते. द्राक्ष हंगामाच्या सुरूवातीला परतीचा पाऊस, ढगाळ हवामान यामुळे दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दावण्या, भुरी रोगाने बागाच्या बागा वाया गेल्या आहेत. घड जिरणे, घड कुजणे या समस्यांनी मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या मुसळधार पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचल्याने घड कमी सुटले आहेत. घडाची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी बेदाणा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बेदाण्याला चांगला दर मिळेल, ही आशा बागायतदार बाळगून होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला आहे. ढगाळ वातावरणाचे संकट उभे राहिले आहे.
१५ ऑक्टोबरनंतर छाटणी घेतलेल्या बागातील द्राक्षे रॅकवर टाकलेली आहेत. रॅकवर टाकलेला बेदाणा झाडणार होते. बेदाणा कार्बोनाईट, डीपिंग ऑईलच्या द्रावणात बुडवला जातो. त्यामुळे ढगाळ हवामानाचा परिणाम होतो. रासायनिक अभिक्रिया होऊन मऊ, चिकट, ओला होतो व काळा पडतो.
ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळा पडणार आहे. बाजारात दर कमी मिळणार आहे. यावर्षी बेदाणा औषधे व इतर साहित्याच्या दरात दीडपटीने वाढ झाली आहे. बेदाणा खर्च वाढला आहे.- विलास शिंदे, द्राक्ष बागायतदार, जालिहाळ खुर्द.