बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

By admin | Published: April 15, 2016 11:02 PM2016-04-15T23:02:36+5:302016-04-16T00:20:59+5:30

उतारा कमी : जत तालुक्यात परिस्थिती गंभीर

Currant production drastically decreased | बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

बेदाणा उत्पादन कमालीचे घटले

Next

गजानन पाटील -- संख -दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, तसेच खत व पाण्याच्या योग्य मात्रेच्या अभावामुळे जत तालुक्यातील बेदाण्यात मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली आहेत. उत्पादनात कमालीची घट झाली आहे. बेदाण्याला बाजारात चांगला दर असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. अवकाळी पावसामुळे काही भागातील द्राक्षातील साखर कमी झाल्यामुळे बेदाण्याचा प्रतिएकरी उताराही कमी झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागात द्राक्षबागांची संख्या अधिक आहे. गतवर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा, शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे पाणी आणून बागा जगविल्या आहेत. तसेच काही बागांना खोड जगविण्यासाठीही पाणी मिळाले नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना थोडे फार पाणी उपलब्ध होते, त्यांनी बागा महत्प्रयासाने जगविल्या. शेतकऱ्यांना उमदी परिसरामध्ये टँकरने पाणी पुरवठा करुन बागा आणल्या आहेत. टँकरसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या, भुरी, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खरड छाटण्या उशिरा झाल्या होत्या. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगविण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड, मणी लहान तयार झाले.आलेली साखरही अवकाळी पावसामुळे कमी झाली. बेदाणा चपटा झाला. चार ते साडेचार किलो द्राक्षातून एक किलो बेदाणा तयार झाला आहे. बेदाण्याचा उतारा कमी झाला. वातावरणातील बदलामुळे बेदाणा दर्जेदार झाला नाही. काळपट बेदाणा तयार झाला. वजनातही कमालीची घट झाली. बेदाण्याचा उतारा एकरी दोन टनाऐवजी दीड लाखापेक्षाही कमी झाला आहे.द्राक्षाला बाजारात म्हणावा तसा भाव मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळला आहे. अनुकूल हवामान, खडकाळ जमीन यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:ची बेदाणा शेड उभी केली आहेत. सध्या बाजारात बेदाण्याला १३० ते १९० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. परंतु कमी पाण्यामुळे दर्जेदार बेदाणा तयार झालेला नाही. यावर्षी द्राक्षांवर बागायतदारांनी मोठा खर्च केला आहे. बँक, सोसायटी, सावकारांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आहे.

अवकाळीने नुकसान : मदतीची मागणी
बेदाण्यासाठी द्राक्षाचा कालावधी १२० दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे. मण्यामध्ये साखरेचे प्रमाण २४ ते २८ इतके असावे लागते. दिवस पूर्ण झाले तरच साखरेचे प्रमाण वाढते. वाढते तापमान, कमी झालेला पाऊस यामुळे कूपनलिका, विहिरीतील पाणी कमी झाले. कमी पाण्यामुळे द्राक्षे लवकर बेदाण्यासाठी शेडवर टाकावी लागली. याचाही परिणाम बेदाणा उत्पादनावर झाला आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली आहे. मणी, घड गळून पडले आहेत. साखरेचे प्रमाण कमी झाल्याने बेदाणा चपटा झाला. शासनाने द्राक्षबागेवरील कर्जे, वीज बिल माफ करावे, अशी आमची मागणी आहे, असे द्राक्षबागायतदार विलास कुंडलिक शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Currant production drastically decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.