शेतकऱ्यांना दिलासा; बेदाणा व्यापाऱ्यांनी पैसे दिले, तासगावमध्ये सौदे निघाले
By अशोक डोंबाळे | Published: April 29, 2024 06:22 PM2024-04-29T18:22:11+5:302024-04-29T18:22:30+5:30
सांगलीतील अडत्यांचे उद्या पैसे मिळणार
सांगली : सांगली आणि तासगाव येथून बेदाणा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनी अडत्यांचे कोट्यवधी रुपये थकीत ठेवले होते. अखेर तासगाव आणि सांगलीतील काही अडत्यांचे पैसे दिल्यामुळे सोमवारी तासगावमधील सौदे निघाले आहेत. तसेच सांगलीतील अडत्यांचे पैसे मंगळवार दि. ३० रोजी मिळणार आहेत. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यामुळे अडत्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सांगली आणि तासगाव सौद्यात विक्री झालेल्या बेदाण्याचे व्यापाऱ्यांकडे सुमारे ४६० कोटी रुपये थकीत राहिले आहेत. याप्रकरणी अडत्यांनी सौदे बंद ठेवले होते. पण, बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करून बेदाणा विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांनी तातडीने देण्याच्या सूचना केल्या होत्या. बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही थकीत पैशासाठी व्यापाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यानुसार व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तासगाव येथील बेदाणा सौदे सोमवारी निघाले आहेत. तसेच, सांगलीतील अडत्यांचे पैसे मंगळवारी व्यापारी देणार आहेत. मंगळवारी पैसे मिळाल्यानंतर बुधवारी सांगलीतही बेदाणा सौदे निघणार आहेत.
आम्ही तर म्हणतोय थकबाकीमुक्तच व्यवहार करा : महेश चव्हाण
बाजार समितीच्या नियमानुसार बेदाणा व्यापारी आणि अडत्यांनी माल खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी पैसे दिले पाहिजेत. पण, व्यापारी आणि अडत्यांनी सामंजस्याने बेदाणा खरेदी केल्यानंतर २५ ते ४० दिवसांत पैसे देण्याचा नियम केला आहे. यामध्ये बाजार समितीचा काहीही संबंध नाही. तरीही थकीत पैशासाठी अडत्यांनी बेदाणा सौदे बंद ठेवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.
बेदाण्याचा उठावच नाही
काही बेदाणा व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, बेदाणा खरेदी केल्यानंतर त्यांची पुढे विक्री म्हणावी तशी झाली नाही. काही ठिकाणी बेदाणा खरेदीच्या मालाचा हिशेब जुळत नव्हता. म्हणून अडत्यांचे पैसे देण्यात उशीर झाला आहे. पण, हिशेब जुळल्यामुळे व्यापाऱ्यांकडून अडत्यांचे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. अडते आणि व्यापारी एकमेकांच्या विश्वासावरच व्यवहार करत आहेत.