देशामधील सध्याचे वर्तमान, वास्तव भयावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:18 AM2017-12-25T00:18:28+5:302017-12-25T00:20:04+5:30
इस्लामपूर : देशातील आजचे वर्तमान आणि वास्तव भयावह आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांना गोळ्या घालून ठार केले जाते. धर्मांध शक्तींच्या कृत्याने तरुणाईची ताकद आणि श्वास गुदमरतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उध्दव कानडे यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कर्मवीर साहित्य नगरीत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व प्रतिष्ठान पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या १९ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन कानडे बोलत होते. ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. डॉ. मनोहर जाधव यांना ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्कार’ देऊन गौरविले.
यावेळी सौ. सरोजमाई पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, प्रकाश रोकडे, आर. डी. पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, मधुश्री होवाळ, अॅड. एन. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संमेलनाला सरोजमाई पाटील यांनी रोख ५ हजार रुपयांची देणगी व्यासपीठावरच स्वागताध्यक्षांकडे सुपूर्द केली.
कानडे म्हणाले, आपलीच माणसे सत्तेसाठी धर्मवादी सनातनी सत्ताधाºयांचे पाय चाटतात. हीच माणसे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारक्रांतीला पुन्हा १०० वर्षे मागे घेऊन जात आहेत. ७० वर्षे स्वातंत्र्य भोगूनसुध्दा भारतीय समाज भेदाभेदाच्या भयाण अंधारात अडकला आहे. स्वातंत्र्य, समता, एकता हे शब्द फक्त निवडणुकीवेळी मतांसाठीच तोंडी लावले जातात. नेत्यांना समाज आणि राष्ट्रहिताची तसेच नीतीमूल्यांची तळमळ नाही. सामाजिक समतेला, बंधुतेला कोणीच समजून घेत नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या मानवतेच्या विचारांना पेलायला आम्ही कमी पडतो आहोत. समाजातील उपेक्षित घटकांना त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी बंधुता मूल्यांची उपासना केली पाहिजे. बोलक्या सुधारकांपेक्षा क्रियाशील कार्यकर्त्यांची फळी उभारताना बंधुता हीच प्रत्येकाची जीवनप्रणाली झाली पाहिजे.
बंधुता परिषदेचे संस्थापक प्रकाश रोकडे म्हणाले, सध्या देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. धोक्यात आलेली लोकशाही वाचवायची असेल, तर प्रत्येकाला ठोस भूमिका घ्यावी लागेल.
डॉ. मनोहर जाधव म्हणाले, आजचे वास्तव भयावह आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. बंधुता आणि विज्ञानाचा प्रसार करताना वैचारिक दिशा देणाºया विचारवंतांच्या हत्या झाल्या. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. मात्र हे लोक थेट हत्या करण्यावर उतरले आहेत. खर्ड्याच्या नितीन आगेची हत्या करणारे सर्वजण निर्दोष ठरले. यावर पुरोगामी महाराष्ट्र व आंबेडकरी चळवळीने प्रश्न उपस्थित केला नाही, हे दुर्दैव आहे.
स्वागताध्यक्ष महेंद्र भारती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे यांनी महाविद्यालयाच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. संमेलनात ‘सत्यार्थी’ स्मरणिका, बंधुतेचा परिसस्पर्श आणि बुध्दवासी बाबा भारती यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन रहस्य’ या पुस्तकाच्या तिसºया आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. नगरसेवक शहाजी पाटील यांनी आभार मानले.
प्रा. वि. द. कदम, प्रा. एन. एस. क्षीरसागर, प्राचार्य एस. बी. माने, प्रा. राजा माळगी, डॉ. एम. एन. शिंदे, प्रा. व्ही. जी. पानस्कर, एस. टी. माने, प्रा. एकनाथ पाटील, प्रा. सतीश चौगुले, त्र्यंबकेश्वर मिरजकर, एम. जी. पाटील, डॉ. दीपा देशपांडे, वृषाली आफळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.