अलमट्टी, हिप्परगी धरणातील सध्याचा पाणीसाठा धोकादायक; कृष्णा महापूर नियंत्रण समितीची कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By अशोक डोंबाळे | Published: July 8, 2024 06:47 PM2024-07-08T18:47:28+5:302024-07-08T18:49:31+5:30
रोज सात टीएमसी आवक
सांगली : कोयना, वारणा, राधानगरीसह कृष्णा खोऱ्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचे हवामान विभागाकडून संकेत आहेत. त्यामुळे हिप्परगी, अलमट्टी धरणातील सध्याचा पाणीसाठा अत्यंत धोकादायक आहे. केंद्र जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तो पाणीसाठा चुकीचा आहे. त्यामुळे राज्य शासनाने कर्नाटकला पाणी सोडण्याबाबत सूचना द्यावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ जूनपर्यंत ५०८.६२ मीटर, ३० जूनपर्यंत ५१३.६० मीटर, १५ जुलैपर्यंत ५१७.११ मीटर व ३० जुलै रोजी ५१३.६० मीटर, तसेच ३० ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरच्या पुढे पाणी साठा करण्यास हरकत नाही. हाच नियम हिप्परगी बंधाऱ्याबाबतही आहे. हिप्परगी येथील बॅरेजची संपूर्ण दारे उघडी करून ३० ऑगस्टपर्यंत हिप्परगीची पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्यात यावी, असे ठरले होते. ठरल्यानुसार केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची अंमलबजावणी कर्नाटक जलसंपदा विभागाने केल्याचे दिसून येत नाही.
अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथे जास्तीत जास्त पाणीसाठा करून ठेवायचे त्यांचे नेहमीचेच धोरण दिसत आहे. या पाणीसाठ्याचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला धोका निर्माण होणार आहे. सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह कृष्णा खोऱ्यात पावसाचा जाेर वाढला आहे. हिप्परगी, अलमट्टी धरणात प्रमाणापेक्षा जास्त पाणीसाठा केल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला तातडीने धरणातून विसर्ग सुरू करून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाचे पालन करावे, अशी सूचना करावी, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनांचीही कर्नाटक सरकारकडून अंमलबजावणी होत नाही.
रोज सात टीएमसी आवक
अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१५.१६ मीटर आहे व तेथील पाण्याची आवक रोज सात टी.एम.सी. आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही आवक वाढण्याची शक्यता असून, दि. ३१ जुलैच्या आत अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९.६० मीटर होण्याची शक्यता आहे. अलमट्टीने विसर्ग वाढवला पाहिजे, अशी मागणीही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केली.