मोबाइल बिघडल्याने जणू श्वासच कोंडला, दुकानांपुढे ग्राहकांच्या घिरट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:27+5:302021-06-06T04:19:27+5:30
फोटो ०५ संतोष ०२ : मोबाइल दुकाने उघडण्यास परवानगी नसली तरी शटर अर्धे उघडून व्यवहार सुरू आहेत. लोकमत न्यूज ...
फोटो ०५ संतोष ०२ : मोबाइल दुकाने उघडण्यास परवानगी नसली तरी शटर अर्धे उघडून व्यवहार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता मोबाइलदेखील जीवनावश्यक वस्तूंमध्ये समाविष्ट झाला आहे, त्यामुळे तो बिघडताच जीव कासावीस होत आहे. दुरुस्तीसाठी ग्राहक दुकानांपुढे घिरट्या घालत आहेत. पावणेदोन महिने दुकाने बंद असल्याने मोबाइलधारकांचा जणू श्वासच कोंडला गेला आहे.
जिल्ह्यातील रुग्णसंख्येला उतार मिळाल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यामध्ये मोबाइल दुकानांचा समावेश नाही; परंतु नागरिकांसाठी ही दुकाने जीवनावश्यकच ठरली आहेत. लॉकडाऊनमध्ये घरात कोंडल्याने सर्वांसाठी टीव्ही आणि मोबाइल सर्वस्व ठरले आहेत. मनोरंजन, वर्क फ्रॉम होम, मुलांचे ऑनलाइन शिक्षण यासाठी मोबाइल अत्यंत जरुरीचा ठरला आहे. कोरोनाचे उपचार घेणारे रुग्णालयातील रुग्ण किंवा विलगीकरणातील कोरोनाबाधित यांच्यासाठीही मोबाइल आधार ठरला आहे. तो बिघडणे म्हणजे जीवघेणे संकटच ठरत आहे. अर्थात, शहाण्या मोबाइलधारकांनी लॉकडाऊन काळात तो बिघडू नये याची पुरेपूर काळजी घेतली. ज्यांचे बिघडले, त्यांची मात्र हालतच पार बिघडून गेली. कधी एकदा दुकाने सुरू होतात आणि मोबाइल दुरुस्त होऊन येतो याची डोळ्यांत प्राण गोळा करून प्रतीक्षा सुरू होती.
गेल्या आठवड्यात शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी दिली, तसे काही मोबाइल दुकानांचे दरवाजेही किलकिले झाले. शहरात स्टेशन रस्ता, बसस्थानक चौक, पंचमुखी मारुती रस्ता, मारुती रस्ता आदी परिसरात दुकानांनी चोरून व्यवसाय सुरू केले. कट्ट्यावर बसायचे, ग्राहक येताच शटर उघडून आत सोडायचे आणि पुन्हा झाकायचे असा खेळ सुरू झाला. दोन-तीन दिवसांपासून मोबाइल दुकाने शटरच्या आत गजबजू लागली आहेत. कोरोना पुरता नियंत्रणात आलेला नसतानाच गर्दी होऊ लागली आहे. जिवापेक्षा मोबाइलच मोलाचा ठरला आहे.
बॉक्स
मोबाइलच लॉक...
- लॉकडाऊनमध्ये अतिवापराने स्क्रीन नादुरुस्त झाली.
- मोबाइलचा स्पीकर बंद पडला.
- मुलांच्या आदळआपटण्याने स्क्रीन फुटली.
- आक्षेपार्ह साइट्समुळे सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस शिरला.
- सततच्या वापराने बॅटरी दोन तासही टिकेना झाली.
- इअरफोन, हेडफोन खराब झाला.
- चार्जिंग करताना मोबाइल खूपच तापतो.
- मुलाने पाण्यात टाकल्याने बंद झाला.
बॉक्स
पावणेदोन महिन्यापासून शटर बंद
मोबाइल विक्री, दुरुस्ती व सुटे भाग विकणारी दुकाने पावणेदोन महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे मोबाइलधारकांची प्रचंड गोची झाली आहे. रिचार्ज ऑनलाइन करता येते; पण दुरुस्तीला प्रत्यक्ष दुकाने उघडण्याशिवाय पर्याय नाही. काही ग्राहकांनी ओळखीच्या तंत्रज्ञाच्या घरी जाऊन दुरुस्तीचा प्रयत्न केला; पण दुकाने बंद असल्याने सुटे भाग मिळाले नाहीत. प्रशासनाने ऑनलाइन विक्रीवरही निर्बंध आणले. त्यामुळे तो मार्गदेखील बंद झाला.
बॉक्स
चोरट्या बाजारात अवाच्या सव्वा दर
काही व्यावसायिकांनी घरातूनच सुटे भाग विक्री सुरू ठेवली; पण अवाच्या सव्वा दर लावले. ५०० रुपयांची बॅटरी हजारांना विकली; पण अडलेल्या ग्राहकांना पर्यायही नव्हता. स्क्रीन गार्ड, इअरफोन, हेडफोन यांच्या किमतीही वाटेल तशा वाढवल्या.
बॉक्स
मोबाइलच्या नादात कोरोनाला आव्हानच
मोबाइलच्या वेडापायी ग्राहक आणि व्यावसायिक कोरोनाला आव्हान देत आहेत. दुकानाच्या बंद दरवाजाआड होणारी गर्दी पोलिसांपासून बचाव करत असली तरी कोरोनाच्या कचाट्यातून मात्र सुटणार नाही. याकडे दुर्लक्ष होत आहे. महापालिका प्रशासनाने काही व्यावसायिकांकडून मोठा दंड वसूल केल्यानंतरही व्यावसायिकांवर वचक बसलेला नाही. मोबाइल बिघडल्याने अस्वस्थ झालेले ग्राहकही व्यावसायिकांवर दबाव टाकून दुकाने उघडायला भाग पाडत आहेत.
कोट
पंधरा दिवसांपूर्वी मोबाइलचा स्पीकर बंद पडला. मुलाच्या ऑनलाइन शिक्षणासाठी तो सुरू राहणे गरजेचे होते. त्यामुळे दुरुस्तीसाठी आलो. दुकानदाराने संध्याकाळी मोबाइल घेऊन जाण्यास सांगितले आहे.
- गजानन लोहार, ग्राहक
मोबाइलची स्क्रीन बंद पडल्याने सर्वच काम थांबले. ऑफिसचे काम, ऑनलाइन पेमेंट्स होऊ शकले नाही. दोन दिवसांपूर्वी दुरुस्तीसाठी दिला होता, आज दुरुस्त होऊन मिळाला. पैसे जास्त गेले; पण माझे काम सुरू होणार आहे.
- सुहास चंदनशिवे, ग्राहक