Video - सामाजिक वाटेवर रंगली सायकलभ्रमंती, सोळाशे किलोमीटरचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:28 PM2019-02-05T13:28:43+5:302019-02-05T17:12:15+5:30
आधुनिक युगात होत असलेली प्रश्नांची घुसमट सोडविण्यासाठी निसर्गाची जपणूक करण्याचा सुंदर मार्ग नाही, असा संदेश देताना सामाजिक वाटेवरून सांगलीच्या सह्याद्री ट्रेकर्स या ग्रुपच्या सदस्यांनी सांगली ते जगन्नाथपुरी अशी सोळाशे किलोमिटरची सायकलभ्रमंती केली.
सांगली : आधुनिक युगात होत असलेली प्रश्नांची घुसमट सोडविण्यासाठी निसर्गाची जपणूक करण्याचा सुंदर मार्ग नाही, असा संदेश देताना सामाजिक वाटेवरून सांगलीच्या सह्याद्री ट्रेकर्स या ग्रुपच्या सदस्यांनी सांगली ते जगन्नाथपुरी अशी सोळाशे किलोमिटरची सायकलभ्रमंती केली.
मोटारसायकल, चारचाकी अशा प्रत्येकप्रकारच्या वाहनांच्या माध्यमातून भ्रमंती करण्याचे उपक्रम विविध संघटना राबवित असल्या तरी निसर्गाशी मैत्रीचे नाते सांगणाऱ्या सायकलच्या माध्यमातून लांबची भ्रमंती करणाऱ्या संघटना, व्यक्ती यांचे प्रमाण कमी आहे. त्यातही सामाजिक जागर करीत त्याच उद्देशाने प्रेरीत होऊन भ्रमंती करणारे तर दुर्मिळ म्हणावे लागतील. सामाजिक, निसर्गपूरक, देशप्रेमाचे संदेश देत सांगलीच्या सह्याद्री गु्रपने नुकताच एक अनोखा उपक्रम राबवित आपली भ्रमंती लक्षवेधी ठरविली.
सह्याद्री ट्रेकर्स या ग्रुपचे सदस्य व सांगली आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुनील कुलकर्णी यांच्यासह शिवाजी कणसे, अनिल कुलकर्णी, विजय वरुडे ,राजेंद्र आवळकर, किशोर माने ,अंबरीश जोशी, सागर माळवदे ,मिलिंद कुलकर्णी ,राहुल बाबर या दहा जणांनी या मोहिमेत भाग घेतला.
'सायकल वाचवा इंधन वाचवा', 'सायकल चालवा, प्रदूषण टाळा, निसर्ग वाचवा, सायकल चालवा, तंदुरुस्त रहा, स्वच्छ भारत, एक भारत श्रेष्ठ भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, अशा सामाजिक संदेशातून जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.
सामाजिक उपक्रमाबरोबरच आपला देश पहाणे आणि समजून घेणे हाही या मोहिमेचा उद्देश असल्याचे सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. सांगली, सांगोला ,मंगळवेढा ,सोलापूर नळदुर्ग ,सास्तापूर ,जहीराबाद हैदराबाद ,विजयवाडा राजमुंद्री, विशाखापट्टणम, इच्चापुरम, छत्रपूर, पालुर जंक्शन, मालूद, जान्हीकुडा, सातपाडा, ब्रम्हगिरी, जगन्नाथ पुरी या मागार्ने पाच राज्यातून हा प्रवास झाला.
रोज सरासरी शंभर ते १२0 किलोमीटर अंतर कापत या ग्रुपने पंधरा दिवसात हा प्रवास पूर्ण केला. या संपूर्ण प्रवासात एकही कटू अनुभव आला नाही. ठिकठिकाणच्या लोकांनी प्रांत, भाषा,धर्म या सगळ्या भेदाच्या भिंती ओलांडून अत्यंत आपलेपणाने सहकार्य केले.
ग्रुपच्या सदस्यांसाठी, समाजासाठी आणि देशासाठी ही भ्रमंती एक आरोग्यदायी अनुभव होता. समाज व देशासाठी प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढेही ग्रुपच्या माध्यमातून निसर्गाशी, समाजाशी, देशाशी असलेले नाते जपत असेच उपक्रम राबविण्यात येतील, अशी भावना ग्रुपच्या सदस्यांनी भ्रमंतीच्या समारोपप्रसंगी व्यक्त केल्या.