डी. के. पाटील, सुनील पाटील भाजपमध्ये
By admin | Published: February 4, 2017 12:05 AM2017-02-04T00:05:49+5:302017-02-04T00:05:49+5:30
तासगावात राष्ट्रवादीला खिंडार; ‘आऊटगोर्इंग’ सुरूच; चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश
तासगाव : ‘आऊटगोर्इंग’ने हैराण झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुक्रवारी तासगावात आणखी मोठे खिंडार पडले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील (विसापूर), पंचायत समितीच्या माजी सभापती गोकुळा शेंडगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
तासगाव येथील मंगल कार्यालयात महसूलमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचा मेळावा झाला. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, नीता केळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
यावेळी महसूलमंत्री पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांची गर्दी पाहिल्यानंतर, तासगाव पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येईल, अशी खात्री आहे. जिल्ह्याच्या राजकारणाला वळण देणारा हा पक्षप्रवेश आहे. महाराष्ट्रात भाजपमध्ये येण्यासाठी रीघ लागली आहे. मुंबईच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री येऊ शकले नाहीत, म्हणून मी आलो आहे. पक्षात प्रवेश केलेल्यांना पदाची इच्छा नसेल, मात्र कामाला न्याय मिळणार असल्याने, आम्ही सर्वांना संधी देऊ. भाजप हा नेत्यांना खूश करणारा पक्ष नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षप्रवेश केलेले लोक हुशार आहेत. पंतप्रधान मोदींचे काम पाहून त्यांनी प्रवेश केला आहे. केंद्र आणि राज्यातील योजना खालीपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे.
खासदार पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील यांचे नेतृत्व घडविणारी नेतेमंडळी केवळ विकासाच्या मुद्यावर कोणतीही अट न घालता भाजपमध्ये आली आहेत. जिल्'ात पाणी योजना, महामार्गासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. पंतप्रधान सिंचन योजनेतून सोळाशे कोटी मंजूर झाले आहेत. पक्षात आलेल्यांनी विकास गतिमान करण्याची भूमिका घेतली आहे. एकेका गावात दोन, तीन गट आहेत. मात्र मोठ्या मनाने एकत्रित येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देखमुख, नीता केळकर यांचीही भाषणे झाली.
नव्याने पक्षप्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील म्हणाले की, मी राष्ट्रवादीत होतो, पण दिनकरआबा घराण्याचा वारसा सोडला नाही. राष्ट्रवादीत असतानाही मी संजयकाकांवरची टीका सहन केली नाही. ज्याला जनतेने मोठा केला, त्याचे पाय मी खेचणार नाही, म्हणून मी त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनीही परिवर्तनाची दिशा ओळखून भाजपमध्ये प्रवेश करावा.
माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील म्हणाले की, दोन वर्षांत राष्ट्रवादीत ‘कार्यकर्ते अडवा आणि कार्यकर्त्यांची जिरवा’ असेच धोरण सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांचे तालुक्यावर प्रेम आहे. मात्र तालुक्यातील नेतृत्वाने दुर्लक्ष केले. जयंत पाटलांची पिलावळ तालुक्यात वाढू देणार नाही, अशा वल्गना येथील नेत्यांनी केल्या. भाजप सरकारने, नरेंद्र मोदींनी परिवर्तन केले, म्हणूनच संजयकाकांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ज्योतिष आणि एक जागा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशानंतर महसूलमंत्री पाटील म्हणाले की, तासगावात एक प्रसिध्द ज्योतिषी आहे. मी तासगावात आल्यानंतर या ज्योतिषाकडे निकालाबाबत विचारणा करणार होतो. मात्र ही गर्दी पाहून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपची सत्ता येईल का, हे या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. आता माझ्या वैयक्तिक कामासाठीच मी ज्योतिषाला भेटणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीतून लोक भाजपमध्ये येत असल्याने, विरोधक, आमच्यासाठी थोडे तरी शिल्लक ठेवा, असे म्हणतील. जे आम्ही घेऊच शकत नाही, ते तुमच्यासाठी शिल्लक ठेवणार आहोत! एखादी जागा विरोधकांना निवडून येण्यासाठी शिल्लक ठेवायला हवी!