नोकरीअभावी डी. एड्.धारकांचे ‘बाशिंग’ झाले जड
By admin | Published: December 5, 2014 10:43 PM2014-12-05T22:43:17+5:302014-12-05T23:33:43+5:30
जिल्ह्यातील स्थिती : चार वर्षांपासून भरतीच नसल्याने विवाहेच्छुकांपासून सनईचे सूर झाले दूर
प्रवीण जगताप -लिंगनूर -तुलसी-विवाह झाला की विवाह सोहळ्यांना वेग येतो. यंदाही तुलसी- विवाहानंतर विवाहेच्छुक वधु-वरांच्या पित्याच्या पायाला भिंगरी लागली आहे. पण जिल्ह्यातील विवाहेच्छुक मंडळींपैकी डी. एड्.धारक युवक-युवतींना नोकऱ्यांअभावी बहुतांश ठिकाणी ठेंगाच दाखविला जात आहे. त्यामुळे शासनाच्या प्राथमिक शाळा, त्यांच्या पटाची धोरणे, उपलब्ध जागा व चार वर्षांपासून ठप्प असणाऱ्या शिक्षक भरतीचा असाही परिणाम अनुभवास मिळू लागला आहे. नोकरभरतीअभावी डी. एड्.धारक युवक-युवतींचे ‘बाशिंग’बळच जड होऊन बसले आहे.
पूर्वी २००५ पर्यंत बारावीनंतर अवघ्या दोन वर्षात डी. एड्.चा कोर्स करून शिक्षकी पेशाची नोकरी गुणवत्तेवर सहज मिळायची. मात्र दरम्यानच्या काळात खिरापत वाटल्याप्रमाणे डी. एड्. कॉलेजची संख्या वेगाने वाढत गेली.
दरवर्षी उपलब्ध नोकऱ्यांच्या तुलनेत कित्येक पट डी. एड्.धारक तयार होऊ लागले. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या घटत्या पटसंख्येमुळे दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या व त्यांच्या समायोजनाचे प्रश्न तयार होत आहेत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा परिषदेत शिक्षक भरतीच झाली नाही. अशात जवळपास तीन लाखांवर डी.एड.धारकांची संख्या झाल्याने टीईटीच्या नावाने शिक्षक पात्रता परीक्षा मागील वर्षापासून सुरू झाली असून, यंदा ही परीक्षा १४ डिसेंबर रोजी आहे. पण एकीकडे शिक्षकांची नोकरभरतीचीच शक्यता नाही, तिथे टीईटी पास होऊन तरी काय उपयोग? असा प्रश्न आहे. काही डी.एड.धारक टीईटीतही पात्र झाले. त्यांना नोकरभरती व सीईटीची प्रतीक्षा आहे.
शिक्षक पदाच्या जिल्हा परिषदेत जागाच नसल्याने नोकरीअभावी डी.एड.धारक पदरात पडेल ते काम पवित्र मानून करू लागले आहेत. पण डी.एड.ची पदवी त्यांचे बाशिंगबळ हलके करू शकत नाही. गुरुजी होण्याचा कोर्स करूनही ते नोकरीस न लागल्याने त्यांना अन्नास मोताद व्हायची वेळ आली आहे. केवळ डी.एड्.धारक असणाऱ्या बेकार युवकाच्या हातात आपल्या मुलीचा हात देण्यास त्या युवतीचे पालक तयार नाहीत, तर डी.एड.धारक युवतींनाही शिक्षकी पेशातील जोडीदाराचा हट्ट आजतागायत धरल्याने त्यांच्या पालकांनाही अद्याप आपल्या मुलीचे दोनाचे चार हात करता येईनासे झाले आहेत. अशा युवतींनी आता पसंतीक्रम बदलण्यास सुरुवात केली आहे. पण युवकांचे मात्र नोकरीअभावी व योग्य स्थळ मिळत नसल्याने लग्नही पुढे ढकलावे लागत आहे.
या अवघड परिस्थितीतूनही २००९ ते २०११ च्यादरम्यान नोकरभरतीत नशिबाने यशस्वी झालेल्या शिक्षकांनी, आपली पत्नीही नोकरदार व शिक्षकी पेशातीलच असावी, असा आग्रह धरला होता. पण मागील दोन वर्षात शोधशोध करूनही निराशा पदरी पडलेले गुरुजन आता दोन-तीन पायऱ्या खाली उतरले आहेत. आता डी. एड्. नव्हे, तर वधू पदवीधारक असली तरी चालेल, या मानसिकतेत ते आले आहेत.
दरवर्षी सांगली जिल्ह्यातून सरासरी ८ हजार ३00 विद्यार्थी डी.एड्. होतात. गतवर्षातील कमी प्रवेश गृहीत धरल्यास गेल्या चार वर्षात जिल्ह्यात किमान २८ हजारजण डी. एड्.धारक झाले आहेत.