सावकाराच्या त्रासातून मिरजेत दाम्पत्याची आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:31 PM2017-11-01T13:31:07+5:302017-11-01T13:48:45+5:30
मिरजेत सुंदरनगर येथे अभिजित विजय पाटील (वय ३०) या औषध दुकानदाराने झोपेच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केली. दोनच महिन्यांपूर्वी अभिजित यांची पत्नी कल्याणी पाटील यांनीसुध्दा गळफास लावून आत्महत्या केली होती.
मिरज ,दि. १ : मिरजेत सुंदरनगर येथे अभिजित विजय पाटील (वय ३०) या औषध दुकानदाराने झोपेच्या गोळ्या प्राशन करून आत्महत्या केली. दोनच महिन्यांपूर्वी अभिजित यांची पत्नी कल्याणी पाटील यांनीसुध्दा गळफास लावून आत्महत्या केली होती.
सावकारांच्या जाचाला कंटाळून या दाम्पत्याला आत्महत्या करावी लागली असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. अभिजित याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
अभिजित पाटील याचे औषध विक्रीचे दुकान आहे. व्यवसायासाठी त्याने काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वत:च्या मालकीचा बंगला विकावा लागल्याने, हे दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते.
सावकारांनी कर्ज परतफेडीसाठी धमक्या देण्यास सुरूवात केल्याने पाटील कुटुंबीय अस्वस्थ होते. या खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून दि. २५ आॅगस्ट रोजी अभिजित याची पत्नी कल्याणी हिने गळफास लावून आत्महत्या केली होती.
हे प्रकरण मिरजेतील काही नेतेमंडळींच्या मध्यस्थीने मिटविण्यात आले होते. मात्र इचलकरंजीतील पंडितराव नामक सावकार कर्जवसुलीसाठी पुन्हा धमक्या देऊ लागल्याने पाटील याने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.
पोलिसातील तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी व कर्जाची रक्कम व्याजासह परत देण्यासाठी इचलकरंजीतील सावकाराने पुन्हा सोमवारी त्याला दमदाटी केली होती. त्यामुळेच अभिजित पाटील याने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
दरम्यान, मृत्युपूर्वी अभिजित पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत, माझी कोणाबाबतही तक्रार नाही, माझ्या अवयवांचे दान करावे, असे लिहिले आहे. दोन महिन्याच्या कालावधितच या तरुण दाम्पत्याच्या आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कर्ज देण्यात मिरजेतील महिलेचा हात
कल्याणी हिचा सहा महिन्यांपूर्वी अभिजित पाटील याच्याशी फेसबुकवरून परिचय झाला होता. त्यानंतर त्यांनी विवाह केला. मात्र एका वर्षाच्या आतच दोघांनी मृत्यूला कवटाळले. या पाटील कुटुंबाला सावकारी कर्ज देणाऱ्यांमध्ये मिरजेतील एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत.