बोरगावजवळ माेटारीच्या अपघातात दाेघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:44+5:302021-07-14T04:32:44+5:30
फाेटाे : १२ बाेरगाव १ (येणार आहे) लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथील वंजारी मळ्याजवळ चालकाचा ...
फाेटाे : १२ बाेरगाव १ (येणार आहे)
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : बाेरगाव (ता. वाळवा) येथील वंजारी मळ्याजवळ चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव माेटार रस्त्याकडेच्या नाल्यात उलटून झालेल्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार झाले. शुभम सयाजी सूर्यवंशी (वय २१), अक्षय सुरेश गायकवाड (रा. बेलवडे, ता कडेगाव) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना साेमवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
अपघातात माेटारीतील अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दाेघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. सर्व जखमींना इस्लामपूर व काेल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय विठ्ठल सूर्यवंशी (वय २५), विकास भार्गव सूर्यवंशी (वय २८), दीपक जगन्नाथ सूर्यवंशी, हरी आनंदा सूर्यवंशी (सर्व रा. बेलवडे) अशी जखमींची नावे आहेत.
बेलवडे (ता. कडेगाव) येथील सहा तरुण कडेगावजवळील धार्मिक व पर्यटन स्थळ असणाऱ्या चौरंगनाथला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगून साेमवारी दुपारी १ वाजता माेटारीतून (क्र. एमएच १२ एमएफ ६२८२) बाहेर पडले हाेते. हे सर्वजण देवदर्शन करून इस्लामपूरला आले असावेत. घरी परत जात असताना बोरगावपासून तीन किलोमीटर अंतरावर वंजारी मळ्याजवळ त्यांच्या माेटारीस अपघात झाला. भरधाव माेटार सरळ रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या नाल्यात पाच फूट खाली जाऊन पुन्हा वर उडाली. ती थेट रस्त्यापासून पंधरा फुटावरील उसाच्या शेतात फेकली गेली. गाडीवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने तब्बल दोनशे ते तीनशे मीटर ब्रेक मारल्याचे घटनास्थळी दिसते.
या भीषण अपघातात शुभम सूर्यवंशी जागीच ठार झाला. तर अक्षय गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करत आहेत.
चौकट
अपघातातील मृत व जखमी सर्वचजण बेलवडे येथे एकाच गल्लीत राहतात. अपघाताची माहिती मिळताच बेलवडे परिसरात शाेककळा पसरली.
चाैकट
सिनेमातील स्टंटप्रमाणे अपघात
ही घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे उभा करणारी होती. एखाद्या सिनेमातील स्टंटप्रमाणे हा अपघात घडला. भरधाव वेगाने आलेली माेटार पाच फूट खाेल नाल्यात काेसळून पुन्हा वर उडाली. हवेतून अंतराळी झेपावत बाजूच्या उसाच्या फडात फेकली गेली. अचानक अपघाताचे हे भीषण दृश्य पाहताच काळजाचा ठाेकाच चुकल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.