आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा
By admin | Published: May 19, 2017 12:36 AM2017-05-19T00:36:50+5:302017-05-19T00:36:50+5:30
आटपाडी तालुक्यात पाण्यासाठी दाहीदिशा
अविनाश बाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : आटपाडी तालुक्यात सध्या २१ टॅँकरने ५१ खेपा करून पाणी टंचाईवर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टॅँकर सुरु असणाऱ्या अनेक गावात १० ते १२ दिवसांतून नागरिकांना पाणी मिळत आहे. उन्हामुळे पाणी मिळविण्यासाठी नागरिकांची दाहीदिशा भटकंती सुरु आहे. दिवसेंदिवस टॅँकरच्या मागणीत वाढच होत आहे.
तालुक्यातील खरीप आणि रब्बी हंगामात ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी जाहीर करुन प्रशासनाने कागदोपत्री दुष्काळ संपुष्टात आणला आहे. प्रत्यक्षात मात्र ३ फेब्रुवारीपासून तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरु करावे लागले आहेत. आणेवारी जादा असल्याने टंचाई जाहीर झाली नाही आणि त्यामुळे टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांऐवजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर राहिले. त्यामुळे सुरुवातीला टॅँकर मंजुरी लाल फितीत अडकून पडली.
सध्या कौठुळी, देशमुखवाडी, भिंगेवाडी, उंबरगाव, पिंपरी बुद्रुक, पुजारवाडी (दिघंची), आवळाई, शेटेवाडी, दिघंची, पिंपरी खुर्द, माडगुळे, खोजानवाडी, बनपुरी, करगणी, बोंबेवाडी, झरे, विभुतवाडी, कुरुंदवाडी, आटपाडी (वाड्या-वस्त्या), आपटे मळा, आंबेवाडी, विठलापूर, मुंढेवाडी, निंबवडे (वाड्या-वस्त्या), लेंगरेवाडी, तडवळे, चिंचोळे, आवळाई वाड्या-वस्त्यांवर २१ टॅँकरच्या दररोज ५१.७५ खेपा कागदोपत्री तरी होत आहेत. तालुक्यातील ३४ हजार ९६८ एवढी लोकसंख्या टॅँकरची वाट पाहत, पाणी टंचाईच्या झळा सोसत कसेबसे दिवस ढकलीत आहे.
दररोज एका नागरिकाला २० लिटर याप्रमाणे हिशेब करुन टॅँकर मंजूर केले जातात. प्रत्यक्षात कुटुंबाला याप्रमाणे पाणी देणे शक्य नसल्याने, टॅँकरचे पाणी १० ते १२ दिवस साठवून लोकांना प्यावे लागत आहे. काही गावात टॅँकरचे पाणी इंजिनने ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत चढविले जाते. त्यामुळे वितरण योग्य होत असले तरी, लोकांना अनेक दिवसांनंतर पाणी मिळते. टॅँकरच्या पाण्यावरुन अनेक गावात दररोज किरकोळ वादावादीचे आणि हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. यावर मात करण्यासाठी लोक पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. वळीव पावसानेही तालुक्याला हुलकावणी दिली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे.
टॅँकरवाले आणि टग्यांची चंगळ!
सध्या सुरू असलेले टॅँकर हे त्या-त्या गावापासून किमान ८ ते तब्बल २५ कि. मी. अंतरावरुन पाणी आणत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी बिघाडाच्या नावाखाली खेपा चुकविल्या जात आहेत. प्रत्यक्षात दररोज १०० टक्के टॅँकर दाखविले जातात. त्यात गावच्या सरपंचांसह सरकारीबांबूचे टॅँकरवाले हात ओले करुन टॅँकरच्या निधीवर डल्ला मारत असल्याचा आरोप केला जातोय. याशिवाय जवळच्या अंतरावरुन खेपा टाकून लांबचे अंतर दाखवून टॅँकरवाले मालामाल होत असल्याची चर्चा आहे.