दहीवीची परीक्षा रद्द केली, परीक्षा शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:30+5:302021-05-18T04:26:30+5:30
सांगली : दहावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शाळांपुढे आहे. पुढील ...
सांगली : दहावीची परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शाळांपुढे आहे. पुढील शैक्षणिक प्रवेशासोबतच दहावी परीक्षेचे शुल्क परत केले जाणार काय? हादेखील प्रश्न आहे. यासंदर्भात शासन किंवा बोर्डाकडून कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शन आलेले नाही.
जिल्ह्यात ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेचा फॉर्म भरला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यामुळे अकरावी, डिप्लोमा, आयटीआय आदी प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार? असा प्रश्न शाळांपुढे आहे. शासनाने सीईटी घेण्याचे सुतोवाच केले आहे; पण वेगवेगळ्या शिक्षणक्रमांसाठी एकच सीईटी चालणार काय? व्यावसायिक शिक्षणक्रमासाठीचा आवश्यक अभ्यासक्रम सीईटीमध्ये असेल काय? असे प्रश्न शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित होत आहेत. दहावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना वर्गोन्नत केले आहे. तथापि, त्यांचे मूल्यांकन होणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे. मूल्यांकनाविषयी कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शन शाळांना अद्याप मिळालेले नाही. मूल्यांकनामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल याचा भरवसा नाही. याचा परिणाम पुढील प्रवेशावर होणार आहे. विशेषत: अभियांत्रिकी डिप्लोमा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थी मागे पडण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे. नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीही त्यांना संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत.
कोट
परीक्षा होणार नसल्याचे बातम्यांमधूनच कळाले. मार्कलिस्ट किंवा बोर्ड सर्टिफिकेटविषयीदेखील काहीही माहिती नाही. शाळांमध्ये चैाकशी केली असता शिक्षकांनाही माहिती नाही. माझे मूल्यांकन कसे होणार, यावर पुढील प्रवेशाचा निर्णय घेणार आहे.
- साहिल कट्टेगिरी, विद्यार्थी, मिरज
दहावीनंतर डिप्लोमा प्रवेश घेणार होतो; पण आता सारेच अनिश्चित आहे. डिप्लोमाची मेरिट लिस्ट कशी तयार होणार, याची धाकधूक आहे. डिप्लोमाचे गणित जमले नाही तर अकरावीला प्रवेश घेईन. बारावी पूर्ण करूनच व्यावसायिक शिक्षणक्रमाचा विचार करावा लागेल.
- विनय जोशी, विद्यार्थी, सांगली
दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता, परीक्षा रद्द झाल्याने भ्रमनिरास झाला. पुढील प्रवेशासाठी सीईटी होणार असल्याचे सांगितले जात आहे; पण त्याची तयारी कशी करायची याची काहीही माहिती नाही. शिक्षण विभाग कोणता निर्णय घेते, यावर लक्ष ठेवून आहे.
- वैदेही कोकणे, विद्यार्थिनी, सांगली.
दहावी परीक्षा रद्द झाली तरी परीक्षा शुल्क परत करण्याविषयी शासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका छापून तयार होत्या. अन्य तयारीही झाली होती. त्यामुळे परीक्षा शुल्क परत करताना शासन याचाही विचार करेल असे वाटते. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येईल त्यानुसार कार्यवाही होईल.
- विष्णू कांबळे, शिक्षणाधिकारी
पॉइंटर्स
दहावीतील एकूण विद्यार्थी - ४०,८४४
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम - १,४७,३,८४०
जिल्ह्यातील एकूण शाळा - ७५०
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क - ३६०