सांगली मार्केट यार्डात दररोज अडीच कोटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 09:34 PM2019-08-13T21:34:47+5:302019-08-13T21:37:20+5:30
पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.
सांगली : महापुराचा सामना करत असलेल्या सांगली शहराच्या आर्थिक नाडीचे केंद्र असलेल्या प्रमुख बाजारपेठा पाण्यात राहिल्या. परिणामी मार्केट यार्डातील दैनंदिन अडीच कोटींचे नुकसान होत असून, पूरस्थिती गंभीरच बनत चालल्याने व्यापाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे. अनेक अडचणींवर मात करत वाटचाल करत असलेली सांगलीची बाजारपेठ आता दहा वर्षे मागे गेल्याची भावना व्यापारी वर्ग हतबलपणे व्यक्त करत आहे.
सांगली शहराला पूर नवा नाही; मात्र तीन दिवसांवर पाणी राहिल्याचे ऐकीवात नसल्याचे व्यापारी सांगतात. यावेळी मात्र आठवडा होऊनही पाणी कमी झाले नव्हते. त्यामुळे बाजारपेठेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
शहरातील व्यापाराचे केंद्र असलेल्या गणपती पेठ, हरभट रोड, मारुती रोड, बालाजी रोड, कापड पेठ, सराफ बाजार परिसरात सोमवारपर्यंत पाणी होते, तर दुसरे महत्त्वाचे केंद्र असलेल्या मार्केट यार्डात पाणी नसले तरी, उलाढाल थांबली होती
मार्केट यार्डात दैनंदिन दोन ते अडीच कोटींची उलाढाल होत असते. हळद, गूळ, बेदाण्यासह इतर शेतीमालाचे दररोज व्यवहार होत असतात. ज्यात देशभरातील व्यापाºयांचा सहभाग असतो व मालही संपूर्ण देशात पाठविण्यात येत असतो. जो माल आहे, तो पाठविण्यात येत नाही. तरीही व्यापाºयांनी अन्नधान्याच्या आवक-जावकला प्राधान्य दिले आहे, जेणेकरून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही.
यापेक्षा भयावह स्थिती प्रमुख बाजारपेठेतील आहे. कपड्यांची दुकाने पाण्याखाली होती. पाणी ओसरल्यानंतर व्यापाºयांना अगोदर या मालाची तजवीज करावी लागत आहे. किराणा मालाचे होलसेल व्यापारी, आॅटोमोबाईल दुकानदारांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. या परिस्थितीत पाणी ओसरल्यानंतर दुकानांची स्वच्छता, आतील मालाची व्यवस्था आणि मग नवीन माल मागविण्यासाठी व्यापाºयांना कसरत करावी लागत आहे. नुकसानीचा केवळ अंदाज लावून व्यापाºयांना धास्ती बसली असून, लाखो रुपयांचे नुकसान सोसायचे कसे, या विवंचनेत व्यापारीवर्ग आहे.
पुरामुळे सांगलीच्या बाजारपेठेची फार मोठी हानी झाली आहे. मार्केट यार्डाला पुराचा फटका नसला तरी, दररोज अडीच कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे. प्रमुख बाजारपेठेतील व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवहार पूर्णपणे सुरळीत होण्यास बराच कालावधी लागणार असल्याने व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
- शरद शहा, अध्यक्ष, चेंबर आॅफ कॉमर्स