इस्लामपूरच्या नगराध्यक्ष दालनात प्रतिमाबदल
By admin | Published: March 1, 2017 11:53 PM2017-03-01T23:53:42+5:302017-03-01T23:53:42+5:30
राजकारण रंगले : जयंतरावांच्या जागी बाळासाहेब ठाकरे, एम. डी. पवार, अशोकदादा पाटील यांच्या प्रतिमा
इस्लामपूर : उरूण-इस्लामपूर नगरपालिकेत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील ३0 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावल्यानंतर, पालिका वर्तुळातही सांगलीप्रमाणेच प्रतिमा बदलाचे वारे वाहू लागले आहे. नगराध्यक्ष दालनाच्या नूतनीकरणानंतर बुधवारी माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रतिमा बाजूला करुन तेथे शहराच्या सत्ताकारणाच्या संघर्षात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या प्रतिमा लावण्यात आल्या.
बुधवारी नगराध्यक्ष दालनात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शहरावर २५ वर्षे अधिराज्य गाजविणारे एम. डी. पवार, तसेच आजच्या विकास आघाडीच्या विजयासाठी तीव्र संघर्ष करण्याची परंपरा घालून दिलेले अशोकदादा पाटील, अशोककाका पवार यांच्या प्रतिमा नगराध्यक्षांच्या दालनात विराजमान झाल्या.
या व्यक्तींनी शहराच्या विकासामध्ये दिलेले योगदान अतुलनीय आहे. या सर्वांचे स्मरण शहरवासीयांना व्हावे, यासाठी बुधवारी या प्रतिमांचे अनावरण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्याहस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पालिकेतील सत्ताबदलानंतर विद्यमान सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष सुरु आहे. यापूर्वी झालेली स्थायी समितीची सभा आणि दोन दिवसांपूर्वी झालेली अर्थसंकल्पीय सभा अशा दोन्हीवेळी हा सत्तेचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. एका बाजूला सत्ता आणि दुसऱ्या बाजूला बहुमत, अशा विचित्र परिस्थितीत नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे सत्तेचा गाडा हाकत आहेत. आता या प्रतिमा बदलानंतर पालिकेतील राजकारण काय वळण घेते, हे पाहणे उचित ठरेल.
यावेळी विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्र्रमभाऊ पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार, बाबासाहेब सूर्यवंशी, शकिल सय्यद, अमित ओसवाल, सतीश महाडीक, प्र्रदिप लोहार, सुप्रिया पाटील, कोमल बनसोडे, अन्नपूर्णा फल्ले, प्र्रतिभा शिंदे, मंगल शिंगण, सीमा पवार, गजानन फल्ले, ए. भास्कर कदम, व विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
महापालिकेतही युद्ध
सांगली महापालिकेतही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आल्यावर अशाचपद्धतीने प्रतिमा बदलण्यात आल्या होत्या. जयंत पाटील यांची महापौर दालनातील प्रतिमा तेव्हापासून गायब झाली आहे. त्यांच्याजागी मदन पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली आहे.