दलित महासंघाचा तिरडी मोर्चा : सांगलीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:01 AM2018-06-23T00:01:02+5:302018-06-23T00:03:26+5:30
तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला.
सांगली : तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. या प्रकाराला डॉक्टरच जबाबदार असून, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
अविनाश बागवडे शासकीय रुग्णालयात गेल्या दहा दिवसांपासून उपचार घेत आहेत.
चार दिवसांपूर्वी त्यांच्याशेजारील एका बेवारस रुग्णाचा मृत्यू झाला होता. पण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे बागवडे यांनाच मृत जाहीर करण्यात आले. पण प्रत्यक्षात बागवडे जिवंत आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात शेजारील बेवारस रुग्णाचा मृतदेह देण्यात आला होता. बागवडे मृत झाल्याचे प्रमाणपत्रही दिले होते.
याचा निषेध करण्यासाठी दलित महासंघाने मोर्चा काढला. मुख्य बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चास प्रारंभ झाला. झुलेलाल चौक, आंबेडकर रस्ता या मार्गावरुन हा मोर्चा रुग्णालयावर आला. पोलिसांनी रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करुन आंदोलकांना आत येण्यास अटकाव केला. तिरडीवर जिवंत व्यक्तीस बसविण्यात आले होते. त्याच्या अंगावर पांढरे कापड, गुलाल टाकून पुष्पहार अर्पण केला होता. रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वनीता कांबळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. उपाध्यक्ष दिलीप शेलार, उषाताई मोहिते, संपर्क प्रमुख महेश देवकुळे, राकेश चंदनशिवे, नेताजी मस्के, सुनील वारे, अजित आवळे, अभिमन्यू वाघमारे, विठाताई देवकुळे, राजीव खैरे, माया कांबळे, अनिल थोरात आदी मोर्चात सहभागी झाले होते.
रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांशी आंदोलकांनी अर्धा तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान प्रशासाने घडलेल्या प्रकराची सखोल चौकशी केली आहे. चार कर्मचाºयांना दोषी धरुन त्यांच्या तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात बदल्या केल्या आहेत. अजूनही काही कर्मचारी कारवाईच्या रडारवर आहेत. त्यांची चौकशी करुन लवकरच कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सीआयडी चौकशीची मागणी
तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भागवत गेल्या दहा महिन्यांपासून सेवेत नाहीत. तरीही मृत्यू प्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रांवर अजूनही त्यांच्या नावाचा गैरवापर सुरु आहे. याची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चातील प्रमुख मागण्या...
बेवारस मृतदेहाची हेळसांड केल्याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणेंसह वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करावे.
बागवडे यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर करावी.
केसपेपर शुल्क वार्षिक दहा रुपये ठेवावे.