शिरगावात दलितास मंदिरात प्रवेश नाकारला , भेदभावाची वागणूक : पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 10:10 PM2017-11-20T22:10:03+5:302017-11-20T22:10:03+5:30
कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजनासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) या दलितास मंदिरात प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस
कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजनासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) या दलितास मंदिरात प्रवेश नाकारल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या पारायणातील भजनाचे आयोजक गोवर्धन बाळकृष्ण खुरासने (रा. शिरगाव) व खासगी मंदिराचे मालक सदाशिव पारखी यांच्यावर कारवाई व्हावी, अशी तक्रार देवानंद कांबळे यांनी पोलिसांत दिली. या प्रकाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
देवानंद कांबळे वांगी येथील रहिवासी आहेत. ते भजनी मंडळामध्ये तबला वाजवितात. शिरगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आयोजित केलेल्या पारायण सोहळ्यानिमित्त संयोजक अध्यक्ष गोवर्धन खुरासने यांनी गावातील एकामार्फत वांगी येथील भजनी मंडळास भजनाचा कार्यक्रम करण्यासाठी बोलाविले होते. त्यानुसार वांगी येथील भजनी मंडळातील स्वत: देवानंद कांबळे यांच्यासह भार्गव मारुती चव्हाण, पार्वती भार्गव चव्हाण,अंकुश बापू माळी (सर्व रा. वांगी) व बबन कोळी (शिवणी) हे पाचजण भजन करण्यासाठी बुधवार, दि. १५ नोव्हेंबररोजी रात्री आठ वाजता शिरगाव येथे पोहोचले.
दरम्यान, मंदिरात जाण्यापूर्वी हे भजनी मंडळ सोनारमामा नावाच्या व्यक्तीच्या घरी गेले होते. त्यावेळी सोनारमामा यांनी गोवर्धन खुरासने यांना भजनी मंडळ आल्याचे कळविले. त्यानंतर लगेच तेथे गोवर्धन खुरासने आले. मात्र त्यांनी सांगितले की, भजनासाठी दलित समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मंदिराचे मालक सदाशिव पारखी यांनीच तसे सांगितले आहे.त्यानंतर देवानंद कांबळे तेथून निघून घरी गेले व इतर चौघांनी मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम केला. कांबळे यांनी भीतीपोटी ही घटना दोन दिवस कोणाला सांगितली नाही. शनिवारी दलित समाजातील काहींना याबाबत सांगितले. त्यानंतर रविवारी रात्री त्यांनी स्वत: पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रिपाइंने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या जातीभेदाच्या वागणुकीबद्दल तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
त्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळालाच पाहिजे : महादेव होवाळ
शिरगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दलित समाजातील व्यक्तीस प्रवेश नाकारून जातीभेद केला गेला. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. प्रशासनाने दलित समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन त्या मंदिरात प्रवेश करावा, तसेच असे कृत्य करणाºया संबंधितांवर कारवाई करावी, असे रिपाइंचे कडेगाव तालुकाध्यक्ष महादेव होवाळ यांनी सांगितले.