वाळवा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:20+5:302021-07-31T04:27:20+5:30
इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती ...
इस्लामपूर : कृष्णा आणि वारणा नदीला आलेला पूर आणि पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्यातील १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी अधिकारी भगवानराव माने यांनी दिली. खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती आणि पूर काळात संपर्कासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याचा ठराव शुक्रवारी करण्यात आला.
पंचायत समिती सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली.
कृषी अधिकारी माने यांनी पीक नुकसानीची माहिती दिली. ते म्हणाले की, वारणाकाठची १३ आणि कृष्णाकाठची २७ गावे पुराने बाधित झाली. उर्वरित ५४ गावांत अतिवृष्टीने सोयाबीन, भुईमूग आणि लागण केलेल्या ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आठ दिवसात पूरबाधित गावांतील पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. त्यानंतर इतर गावांतील पंचनामे करण्यात येतील. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी सहायक आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत १४ गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. बंद पडलेल्या पाणी योजना सुरू करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे उपअभियंता आर. जी. कांबळे यांनी सांगितले. पावसामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून पूर काळात संपर्क राहण्यासाठी रस्त्यांची उंची वाढविण्याची सूचना उपसभापती नेताजीराव पाटील यांनी केली. चर्चेत राजश्री फसाले, पी. टी. पाटील, मारुती खोत, आशिष काळे यांनी भाग घेतला.
तालुक्यात ९८ टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस
तालुक्यातील ९८ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस आणि ४० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले. पूरबाधित गावांतील जनावरांचे लसीकरण आणि औषधोपचार करण्यात येत आहेत. मृत जनावरे आणि कोंबड्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर केल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्व जि. प. शाळांना १५ व्या वित्त आयोगातून स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत.