चांदोली अभयारण्यात आगीमुळे नुकसान; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 10:22 PM2022-03-31T22:22:23+5:302022-03-31T22:35:04+5:30

चांदोली वनपालांच्या मते, अडीच एकर क्षेत्रात आग लागली होती. मात्र हे क्षेत्र जास्त असण्याची शक्यता आहे.

Damage caused by fire in Chandoli Sanctuary | चांदोली अभयारण्यात आगीमुळे नुकसान; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

चांदोली अभयारण्यात आगीमुळे नुकसान; आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न

Next

 वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या चांदोली बुद्रुक येथील जानाईवाडीनजीक डोंगरास गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अज्ञातांनी आग लावली. या आगीत वनसंपदेचे प्रचंड नुकसान झाले असून, वन्यजीव कर्मचाऱ्यांकडून आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

चांदोली वनपालांच्या मते, अडीच एकर क्षेत्रात आग लागली होती. मात्र हे क्षेत्र जास्त असण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा संपर्क न झाल्यामुळे या आगीत नेमके किती क्षेत्र जळून खाक झाले, हे समजू शकले नाही. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पानजीक वणवा लागण्याची या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. वाऱ्याचा वेग असल्याने तितक्याच वेगाने आग सगळीकडे पसरत होती. धुराचे लोळ परिसरात पसरले होते. या आगीमध्ये डोंगररांगातील झाडेझुडपे अनेक जीवजंतू, सरपटणारे प्राणी जळत असून, वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे.

काही लोकांकडून या परिसरातील डोंगररांगांना आगी लावल्या जात आहेत. या डोंगररांगांमध्ये आंबा, जांभूळ, सागवान, निलगिरी, अशोका, भेडा, गेळी, अंजनी, कुंभा, आंबिरा, हिरडा, नरक्या अशा विविध प्रकारच्या झाडांप्रमाणे करवंद, तोरणा, आवळा अशी झुडपे आहेत. अभयारण्याला लागूनच या डोंगररांगा असल्याने अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व या डोंगररांगांमध्ये टिकून आहे. आगीत सरपटणारे प्राणी, दुर्मिळ व औषधी वनस्पती तसेच अनेक वन्यजीव जळून खाक होत आहेत. वन्यजीव विभागाकडे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने अथवा त्यासाठी लागणारी कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याने आग शमविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Damage caused by fire in Chandoli Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग