सांगली जिल्ह्यात ६६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 03:59 PM2019-08-17T15:59:45+5:302019-08-17T16:00:34+5:30
पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
सांगली : पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवनाला बाधा पोहोचली असून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रशासनाच्यावतीने केलेल्या नजर अंदाज पाहणी अहवालानुसार १ लाख १९ हजार ७२४ शेतकऱ्यांचे ६६ हजार ९८.५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये उसाच्या सर्वाधिक ३५ हजार हेक्टरचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पूरस्थिती आटोक्यात येत असताना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, पुरामुळे पाच तालुक्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. अजूनही शिवारात पाणी असल्याने पंचनाम्यास अडचणी येत असल्या तरी, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. जिल्ह्यात ८५ हजार हेक्टर क्षेत्र उसाचे असून यातील ३५ हजार हेक्टरवरील उसाचे पुरामुळे नुकसान झाले आहे. उसाबरोबरच केळी, सोयाबीन, भात, द्राक्षे या पिकांचेही नुकसान झाले आहे.
पूरबाधित क्षेत्रातील शाळा सोमवारपासून पूर्ववत सुरू होतील. अशा परिस्थितीत मुलांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्यात यावी. त्यांना स्वच्छ पाणी देण्याबरोबरच शाळेची इमारतही स्वच्छ करून घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.