पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:45 PM2022-09-16T13:45:59+5:302022-09-16T13:46:40+5:30

पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान

Damage to Kharipa crops on an area of ​​more than twenty five thousand acres in Tasgaon taluka of Sangli district due to rains | पावसाचा थांबेना फेरा, वाया गेला खरीप हंगामाचा पेरा

संग्रहित फोटो

Next

तासगाव : तालुक्यात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील अंदाजे पंचवीस हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. उरल्या-सुरल्या पिकांतून उत्पादन मिळेल, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे उत्पादन दूरच, घातलेला खर्चही वाया गेला आहे. नुकसानीचे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

तासगाव तालुक्यात खरिपाचे ३३ हजार १२८ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे त्यापैकी ३० हजार २४९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस उशिरा आल्याने, पेरा उशिरा झाला. मात्र पेरणी झाल्यानंतर सुरू झालेला पाऊस थांबता थांबला नाही. काही दिवसांचा अपवाद सोडला तर तालुक्यात संततधार कायम होती. उघडीप मिळाली तरी सूर्यदर्शन हाेत नव्हते. त्यामुळे पेरा वाया गेला. विशेषतः तालुक्याच्या पूर्व भागात ज्वारी, बाजरीसह कडधान्याची पिके वाया गेली आहेत.

पेरणीसाठी खते, औषधे, बियाणे, मेहनतीसाठी कराव्या लागलेल्या खर्चाचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. शासनाकडून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी नुकसानभरपाई जाहीर केली आहे; मात्र तासगाव तालुक्यातील अतिवृष्टीची नोंद शासन दरबारी नाही. त्यामुळे भरपाई मिळणार नाही. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानीची झळ सहन करावी लागली आहे.

अतिवृष्टी नाही; नुकसानभरपाई नाही

सततच्या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भुईमूग आणि मका पिकाचा अपवाद सोडला तर अन्य पिकांच्या बाबतीत उत्पादन नाही. शासन दरबारी अतिवृष्टीसाठीच भरपाई जाहीर केली आहे. तालुक्यात अतिवृष्टीची नोंदच नसल्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

तालुक्यातील पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये) :

  • खरीप ज्वारी : १५ हजार ७५५
  • मका : १ जार ८८१
  • इतर तृणधान्य : ७०
  • तूर : ४९२
  • मूग : ३०७
  • उडीद : ८६२
  • इतर कडधान्य : ४१५
  • भुईमूग : चार हजार ७०५
  • सोयाबीन : पाच हजार ७५२

तासगाव तालुक्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यायला हवी. शेतीला पाणी लागल्याने शेती धोक्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणायला हव्यात. - संजय पाटील, माजी सभापती, पंचायत समिती, तासगाव

Web Title: Damage to Kharipa crops on an area of ​​more than twenty five thousand acres in Tasgaon taluka of Sangli district due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.