द्राक्षबागांचे नुकसान ११०० कोटींचे, भरपाई अवघी ५४ कोटींची; सांगली जिल्ह्यातील बागायतदारांचा भ्रमनिरास 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 06:23 PM2024-01-03T18:23:19+5:302024-01-03T18:23:51+5:30

पंधरा हजार हेक्टरचे नुकसान; मदतीत तुटपुंजी वाढ

Damage to vineyards is 1100 crores, compensation is only 54 crores; Disillusionment of gardeners in Sangli district | द्राक्षबागांचे नुकसान ११०० कोटींचे, भरपाई अवघी ५४ कोटींची; सांगली जिल्ह्यातील बागायतदारांचा भ्रमनिरास 

द्राक्षबागांचे नुकसान ११०० कोटींचे, भरपाई अवघी ५४ कोटींची; सांगली जिल्ह्यातील बागायतदारांचा भ्रमनिरास 

दत्ता पाटील

तासगाव : अवकाळीने झालेल्या नुकसानीत प्रशासनाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे केले. ३७ हजार ५०० एकर द्राक्ष बागांचे नुकसान शासनदरबारी नोंद झाले. नुकसान झालेल्या द्राक्षबागांना एकरी तीन लाखांचा फटका बसला. शासनाने जुन्या निकषात तुटपुंजी वाढ करीत हेक्टरी ३६ हजार रुपये मदत जाहीर केली. त्यामुळे नुकसान अकराशे कोटींचे आणि भरपाई अवघी ५४ कोटी मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागेचे ८० हजार एकर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे सतत तीन वर्ष द्राक्ष बागायतदारांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. ऐन हंगामातील द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यात जिल्ह्यातील तब्बल ३७ हजार ५०० एकर द्राक्षबागांच्या नुकसानीची नोंद शासनदरबारी झाली. किंबहुना याहीपेक्षा जास्त द्राक्ष बागांचे नुकसान झाले असताना प्रशासनाने केवळ नियमावर बोट ठेवल्यामुळे नोंद कमी झाली.

सततच्या नुकसानीने द्राक्ष उत्पादक पूर्णपणे कोलमडून गेला आहे. द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा, यासाठी एकरी एक लाखाची मदत आणि कर्जमाफीची मागणी शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनीही केली होती. मात्र, या मागणीला शासनाने केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शेती औषधे आणि मजुरावंर एकरी सरासरी तीन लाखांचा खर्च करावा लागला. बाग वाया गेल्याने एकरी तीन लाखांचा फटका बसला आहे.

शासनदरबारी नोंद ३७ हजार ५०० एकर क्षेत्रात तब्बल अकराशे कोटीचे नुकसान झाले आहे. शासनाकडून फळबागांसाठी पूर्वी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येत होती. त्यात वाढ करून हेक्टरी ३६ हजार देण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. यंदा तीन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्राला मदत देण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार नुकसानग्रस्तांना अकराशे कोटीच्या नुकसानीच्या मोबदल्यात, अवघे ५४ कोटी पदरात पडणार आहेत. भरीव मदतीची अपेक्षा असताना, शासनाने तुटपुंजी वाढ करून द्राक्ष उत्पादकांचा भ्रमनिरास केला आहे.

अशी आहे मदत

जुनी मदतीची रक्कम - नवीन मदतीची रक्कम (प्रति हेक्टरी रक्कम)
जिरायत पिके : ८५०० - १३६००
बागायत पिके : १७००० - २७०००
फळबागा - २२५०० - ३६०००

Web Title: Damage to vineyards is 1100 crores, compensation is only 54 crores; Disillusionment of gardeners in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली