‘आपत्कालीन’च्या बैठकीला सांगलीत अनेकांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:20 PM2018-06-11T23:20:35+5:302018-06-11T23:20:35+5:30
महापालिकेच्या आपत्कालीन नियोजन बैठकीला महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दांडी मारली.
सांगली : महापालिकेच्या आपत्कालीन नियोजन बैठकीला महापौर हारुण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दांडी मारली. उपायुक्त सुनील पवार यांच्यासह मोजक्याच नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठकीचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. नगरसेवकांनी पुन्हा एकदा चिखलमय रस्ते, क्रॉसपाईप, नालेसफाईवरून प्रशासनाच्या कारभाराचा पंचनामा करीत आणखी किती बळी घेणार आहात, असा संतप्त सवालही केला.
महापालिकेच्या गत आठवड्यात झालेल्या महासभेत नगरसेवकांनी पावसाळी मुरूम, क्रॉस पाईप व नालेसफाईवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर हारुण शिकलगार यांनी आपत्कालीन नियोजनासाठी स्वतंत्र बैठक घेण्याची ग्वाही दिली. त्यानुसार सोमवारी ही बैठक पार पडली. पण या बैठकीला खुद्द महापौरांनीच दांडी मारली. त्यांच्यासह आयुक्त रवींद्र खेबूडकर, मिरज उपायुक्त स्मृती पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते हे गैरहजर राहिले. अखेर उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्याला उपमहापौर विजय घाडगे, शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने, राजेश नाईक, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, गौतम पवार, दिलीप पाटील, शिवराज बोळाज, बाळू गोंधळी, राजू गवळी असे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. चार प्रभागाचे सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक आरोग्याधिकारी व मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी, बांधकामचे उपअभियंता सतीश सावंत यांनीही बैठकीला हजेरी लावली होती.
बैठकीत नगरसेवक राजू गवळी यांनी शामरावनगरचा प्रश्न पुन्हा एकदा मांडला. रुक्मिणीनगरमधील घटनेचा संदर्भ देत आणखी किती बळी घेणार आहात, असा संतप्त सवालही केला. प्रशासनाच्या नावाने बोंब मारण्याचे शिल्लक राहिले आहे. रुक्मिणीनगरमध्ये बळी जाऊनही संथ गतीने काम सुरू आहे. औषध फवारणी होत नाही. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. भोबे गटार स्वच्छ करण्याची गरज आहे. आपत्कालीनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावेत, अशी मागणी केली.
उपमहापौर घाडगे म्हणाले की, प्रभाग तीनच्या कार्यक्षेत्रात नालेसफाई सुरू झाली नाही. मुरूमाचा पत्ता नाही. आम्ही गाºहाणे कुणाकडे मांडायचे? असा सवाल केला. शेखर माने म्हणाले की, महापालिकेचे अधिकारी अजूनही सुटीच्या मुडमध्ये आहेत. २००५ च्या महापूरात जीवितहानी झालेली नव्हती; पण आता चिखलमय रस्ते, पाणी टंचाईने नागरिकांचे बळी जात आहेत. अधिकारी व कर्मचाºयांवर वरिष्ठांचे नियंत्रणच राहिलेले नाही.
दिलीप पाटील म्हणाले की, सांगलीवाडीतील सांडपाणी नदीत सोडले जात आहे.
गेल्या पाच वर्षापासून मलनिस्सारण केंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी आम्ही करीत आहोत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगन्नाथ ठोकळे यांनी, नालेसफाई, क्रॉस पाईपवरून अधिकाºयांना धारेवर धरले. उपायुक्त पवार यांनी, बांधकाम आणि स्वच्छता विभागाशी समन्वय साधून लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून आपत्कालीन नियोजनाची पूर्तता करावी असे आदेश दिले.
उपायुक्तांचा : आधार
महापालिकेचा गेल्या सहा महिन्यातील कारभार पाहिला, तर उपायुक्त सुनील पवार यांचाच आधार आहे. महापालिकेच्या सभा, स्थायी समितीची सभा असो अथवा कोणतीही बैठक असो, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ती पार पाडली जाते. पदाधिकारी, नगरसेवकांच्या प्रश्नांना उपायुक्तांना सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडून मात्र सभा, बैठकांना टाळण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे या बैठकीतही शेखर माने यांनी, आयुक्त खेबूडकर महापालिकेत असून बैठकीला न आल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.