राष्ट्रीय महामार्गाच्या भिंतीमुळे अंकली-धामणीत पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:28+5:302021-06-24T04:19:28+5:30
सांगली : सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाच्या कामात धामणी ते अंकली दरम्यान भराव टाकून १३ फुटाची भिंत बांधण्यात ...
सांगली : सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाच्या कामात धामणी ते अंकली दरम्यान भराव टाकून १३ फुटाची भिंत बांधण्यात येणार आहे. या परिसराला नेहमीच पुराचा धोका असतो. अशा परिस्थितीत एवढी मोठी भिंत बांधली गेल्यास पुराचा धोका आणखी वाढणार आहे, त्यामुळे याठिकाणी भराव टाकून भिंत बांधण्याऐवजी खांब उभे करून पूल बांधण्याची मागणी परिसरातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
विठ्ठल पाटील यांच्यासह परिसरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेत भूमिका विशद केली.
पाटील म्हणाले की, या परिसरात नेहमीच पुराचा धोका असतो. सांगली, मिरज शहरासह धामणी, अंकली, बामणी, हरिपूरला पुराचा धोका कायम असतानाही सध्या या महामार्गाचे काम सुरू आहे. हा महामार्ग समतल होण्यासाठी १३ फूट भराव टाकून रस्ता उंच करण्यात येणार आहे. असे झाल्यास पूर्णवेळी हरिपूरकडून येणारे पाणी अडले जाणार आहे व या भागातील ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदारांना भेटल्यावर त्यांनी कामात बदल कऱण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता विनंती मान्य करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महावीर पाटील, प्रदीप मगदूम, अदिनाथ मगदूम, सुनील पाटील, प्रदीप खवाटे, किरण कुंभार, विकास हणबर आदी उपस्थित होते.