दिघंची-निंबवडे रस्त्यावर विद्युत तारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:15+5:302021-03-28T04:25:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंचीपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर दिघंची-निंबवडे रस्त्यावर विद्युत वाहक तार हाताच्या अंतरावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघंची : आटपाडी तालुक्यातील दिघंचीपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर दिघंची-निंबवडे रस्त्यावर विद्युत वाहक तार हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या धोकादायक परिस्थितीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
विट्याला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने अनेक मोठी वाहनेही या मार्गाने जातात. त्यामुळे मोठ्या वाहनांना विद्युत वाहक तारेचा स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. या तारा इतक्या खाली आल्या आहेत की अगदी ट्रॅक्टर अथवा बैलगाडीमधून वैरण नेतानाही तारांचा त्यास स्पर्श होऊन दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जोरात सुटणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विद्युत वाहक तारा जोरात हलतात. यामुळे तारा तुटून पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महावितरणचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.