वारणा डावा कालव्याला पावसाच्या पाण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:18 AM2021-06-19T04:18:03+5:302021-06-19T04:18:03+5:30
फोटो - खवरेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा कालव्यालगत पावसाचे पाणी तुंबले आहे. सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : ...
फोटो - खवरेवाडी (ता. शिराळा) येथे वारणा कालव्यालगत पावसाचे पाणी तुंबले आहे.
सहदेव खोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : सध्या पावसामुळे वारणा डाव्या कालव्याच्या भरावाला रानावनांतून वाहून आलेले पाणी साचून तुंबले आहे. या पाण्याचा दाब ठिकठिकाणी कालव्याच्या भरावावर पडत आहे. यामुळे कालव्याला धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने या ठिकाणी पाणी निचऱ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
शिराळा तालुक्यात चांदोली धारणापासून ते देववाडीपर्यंत वारणा डावा कालवा आहे. सध्या सागाव परिसरात कालव्याची कामे सुरू आहेत. पूर्वी झालेल्या कामांत कालवागळतीची समस्या आहे. आता कालव्याच्या डावीकडील बाजूच्या भारावाला ठिकठिकाणी रानावनांतून वाहून आलेले पावसाचे पाणी तुंबलेले आहे. वास्तविक हे तुंबलेले पाणी कालव्यात न घेता ते ओढ्यांमध्ये कसे जाईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. मात्र याकडे त्या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
सध्या या तुंबलेल्या पाण्याचा दाब कालव्याच्या भरावावर पडत असून वेगवेगळ्या प्रकारांनी हे पाणी गाळासह कालव्यात जात आहे. शिवाय अनेक ठिकाणी या बॅकवॉटरमुळे कालव्याला भगदाडही पडले आहे. तुंबलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतांत घुसून पिकांचे नुकसान होत आहे. बॅकवॉटरमुळे जर कालवा तुटला तर तेथील जादा कामाचा भार शासनावर पडणार आहे व आर्थिक नुकसान होणार आहे.
चौकट
कालव्यात झुडपांचे साम्राज्य
कालव्यात अनेक ठिकाणी झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. कालव्याच्या अस्तरीकरणाला धोका पोहोचत आहे. काही ठिकाणी जलपर्णीचा विळखाही आहे. कालव्याची नवीन कामे होत असली तरी जुन्या कामांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.