विट्यातील धोकादायक इमारती पालिकेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:05+5:302021-09-23T04:30:05+5:30
फोटो - विटा येथील यशवंतनगर उपनगरातील मारुती धर्माधिकारी यांची धोकादायक इमारत बुधवारी पालिका प्रशासनाने जेसीबी यंत्राद्वारे भुईसपाट केली. दिलीप ...
फोटो - विटा येथील यशवंतनगर उपनगरातील मारुती धर्माधिकारी यांची धोकादायक इमारत बुधवारी पालिका प्रशासनाने जेसीबी यंत्राद्वारे भुईसपाट केली.
दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहरात मंगळवारी इमारतीचा छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप अनिता माळी यांचा बळी गेल्यानंतर, विटा नगरपालिका ॲलर्ट झाली आहे. शहरातील धोकादायक व जीर्ण इमारती पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची मोहीम पालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारती आता नगरपालिकेच्या रडारवर आल्या आहेत.
विटा नगरपालिकेने बुधवारपासून शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींची शोधमोहीम सुरू केली आहे. ज्या जीर्ण व अतिधोकायक इमारती आहेत, त्या मालमत्ताधारकांना नोटीस देऊन इमारती काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी मुदतही दिली आहे. परंतु, जे मालक मुदतीनंतरही धोकादायक इमारती काढून घेणार नाहीत, त्या इमारती स्वत: पालिका प्रशासन पोलीस बंदोबस्त घेऊन जमीनदोस्त करणार आहे.
विटा शहरात बुधवारी पालिका प्रशासनाने यशवंतनगर येथे जीर्ण व धोकादायक इमारती भुईसपाट केल्या आहेत. ही कारवाई करीत असताना मालमत्ताधारकांचा विरोध होत आहे. परंतु, मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी या विरोधाला न जुमानता पालिकेच्या पथकाने धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या या कारवाईचा धसका धोकादायक इमारती असलेल्या मालमत्ताधारकांनी घेतला आहे.
चौकट :
अतिक्रमणांवरही पडणार हातोडा
विटा येथील धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम संपल्यानंतर, पालिका प्रशासन अतिक्रमणावर हातोडा टाकणार आहे. ज्या गाळेधारकांनी अनधिकृतरीत्या दुकान गाळ्यांच्या पुढील बाजूस लोखंडी पत्र्याचे शेड तयार करून अतिक्रमण केले आहे, अशा मालमत्ताधारकांचा पथकाद्वारे शोध घेऊन प्रथम त्यांना नोटीस देणार आहे. त्यानंतरही त्यांनी अतिक्रमण काढून घेतले नाही, तर प्रशासनाच्या वतीने अतिक्रमणावरही हातोडा टाकला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी दिली.