आष्टा पालिकेच्या सभेत घंटागाडी खरेदीप्रश्नी वादंग : घरकुलांचे ७०२ प्रस्ताव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:28 PM2018-10-11T21:28:00+5:302018-10-11T21:30:31+5:30
आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना
आष्टा : आष्टा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घंटागाड्या खरेदीच्या विषयावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत जोरदार खडाजंगी झाली. नोकरभरतीवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांना नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी चांगलेच खडसावले.आष्टा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्षा रुक्मिणी औघडे उपस्थित होत्या.
बैठकीत स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत आष्टा पालिकेस थ्री स्टार रेटिंग देण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा, तसेच आष्टा शहर हागणदारीमुक्त झाले असून ओडीएफ प्लस रेटिंग देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १३९३ अर्ज आले असून, ७०२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासन निकषानुसार मंजुरीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी यावेळी दिली.
नगरसेवक अर्जुन माने म्हणाले, शहरातील मयूर माने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. पालिकेने त्यांच्या मुलांना दहा लाखाची मदत देऊन त्यांच्या शाळेचा खर्च करावा. बाजार कट्टा परिसरात अतिक्रमण करून राहिलेल्या पारधी लोकांना बाहेर काढावे, पालिका कर्मचाºयांकडून जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी अधिक रक्कम घेतली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, याबाबत संबंधितांना समज द्यावी, पालिकेच्या सर्व कर्मचाºयांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करावी.
बैठकीत विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी, सोमलिंग तलाव, नोकरभरती, घंटागाडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डिजिटल फी आकारणीबाबत सत्ताधाºयांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी त्यांना, सभेत अभ्यास करून बोला, अशा शब्दात खडसावले. बैठकीत तेजश्री बोन्डे, वर्षा औघडे यांनीही नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. झुंझारराव पाटील, धैर्यशील शिंदे, सुनील माने, संगीता सूर्यवंशी, सारिका मदने, शेरनवाब देवळे, पी. एल. घस्ते, पुष्पलता माळी, मनीषा जाधव आदी यावेळी उपस्थित होते
मुख्याधिकारी सभेस अनुपस्थित
आष्टा पालिकेच्या सभेत मुख्याधिकारी हेमंत निकम अनुपस्थित होते. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सल्लागार अभियंता चंद्रकांत पाटील यांनी दिली; तर आरोग्य अधिकारी आर. एन. कांबळे यांनी विषय वाचन केले. आष्टा पालिकेच्या सभेत विरोधी पक्षनेते वीर कुदळे यांनी विषय वाचन सुरू असताना, घंटागाड्या कधी येणार, याबाबत विचारले असता, नगराध्यक्षा स्नेहा माळी यांनी, विषय झाल्यानंतर चर्चा करू, असे सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी, पालिकेला ९ घंटागाड्या मंजूर झाल्या असून, ६ गाड्यांचे टेंडर तांत्रिक चुकीमुळे पुढे गेले आहे असे सांगून, पुढील बैठकीत यावर निर्णय घेण्यास मान्यता दिली.