द्राक्षशेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:45 PM2017-10-15T23:45:28+5:302017-10-15T23:45:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
तासगाव : तालुक्याच्या सर्व भागात वादळी वाºयासह पाऊस पडत असून शनिवारी रात्रभर पाऊस पडल्याने फ्लॉवरिंग स्टेजला आलेल्या द्राक्षबागांतील घडांमध्ये पाणी साचून ते कुजत आहेत. दिवसभर ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठा हल्ला झाला आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदार हवालदिल झाले आहेत.
सध्या द्राक्षाचा हंगाम ऐन बहरात आहे. दोन वर्षापूर्वी निलोफर चक्रीवादळाचा जोरदार फटका तासगाव तालुक्यातील द्राक्षबागायतदारांना बसला होता. या धर्तीवर हवामान बिघडल्याने व पावसाने द्राक्षबागायतदार गारठले आहेत. पावसामुळे द्राक्षाचे घड कुजले असून दावण्या रोगाने आगाप द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.
द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची देश-विदेशात ओळख आहे. तालुक्यात हजारो एकर क्षेत्रावर द्राक्षशेती केली जाते. तासगावची उच्च प्रतीची द्राक्षे व बेदाणा देश-विदेशात पाठविला जातो. दोन वर्षांपूर्वी निलोफर चक्रीवादळामुळे तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. फ्लॉवरिंग स्टेजलाच पाऊस, धुके व ढगाळ हवामानामुळे दावण्या रोगाचा मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांवर फैलाव झाला होता. शेकडो एकर क्षेत्र या रोगास बळी पडले होते.
ंबागायतदार गारठला
गेल्या ५ दिवसांपासून तासगाव तालुक्यात दिवसा ढगाळ हवामान आहे, तर रात्री पाऊस पडत आहे. त्यामुळे दावण्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात बागांवर होत आहे. सध्या द्राक्षाची वांझ काढणे, डिपिंग, व फ्लॉवरिंग अवस्था आहे. यादरम्यान दावण्याचा फैलाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे द्राक्षबागायतदार गारठला आहे. औषध कंपन्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. दावण्या रोगाचा हल्ला रोखण्यासाठी बागायतदार महागडी विविध कंपन्यांची औषधे खरेदी करताना दिसत आहेत. मात्र गुणवत्ता कमी असल्याने त्यांचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. रब्बीच्या हरभरा, शाळू, गहू या पिकांना हा पाऊस पोषक असला तरी, द्राक्षांना मारक ठरत आहे.