कर्नाटकातील सरपंचाचा संशयास्पद मृत्यू
By admin | Published: August 3, 2016 12:25 AM2016-08-03T00:25:56+5:302016-08-03T00:25:56+5:30
लवंगातील घटना : मित्र बेशुद्ध; सांगली-कर्नाटक पोलिसांकडून संयुक्त तपास
सांगली/उमदी : कन्नूर (ता. इंडी, जि. विजापूर) येथील सरपंच सुधीर सोड्डी (वय ४५) यांचा लवंगा (ता. जत) येथे मंगळवारी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांचे मित्रही गंभीर जखमी असून, ते बेशुद्ध आहेत. या घटनेची माहिती मिळताच विजापूर तसेच सांगली पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. रात्री उशिरापर्यंत या घटनेचा उलगडा करण्याचे काम सुरु होते.
सोड्डी व त्यांचे मित्र दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात देवदर्शनासाठी आले होते. मंगळवारी सायंकाळी ते दुचाकीवरून कन्नूरकडे निघाले होते, पण लवंगापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील गिरगाव रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला; तर एक मित्र गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी सोड्डी यांना मृत घोषित केले. मित्रावर उपचार सुरु ठेवले आहेत. सोड्डी यांच्या वाहनाला मोटारीने पाठीमागून धडक दिली आहे. यामध्ये ते व मित्र गाडीवरुन पडले. त्यानंतर पुन्हा मोटारीने त्यांना धडक दिली. यात सोड्डी यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांनीही, त्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांचा खून केल्याचा आरोप केला आहे.
सोड्डी यांचा मित्र शुद्धीवर आल्यानंतर या घटनेचा उलगडा होईल. पण त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले. सोड्डी यांचा राजकीय वादातून घातपात झाला आहे. पाळत ठेवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. सोड्डी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद रात्री उशिरा उमदी पोलिस ठाण्यात करण्यात आला. (प्रतिनिधी)
जखमी पोलिसाचा भाऊ
सोड्डी यांच्या मित्राचे नाव रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या रेकॉर्डवर आले नव्हते. त्यामुळे नाव समजू शकले नाही. त्याचा भाऊ विजापूर पोलिस दलात हवालदार आहे. तो वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनावर चालक आहे. त्यामुळे विजापूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.