मुसळधार पावसामुळे सांगलीला महापुराचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:53 AM2019-08-05T09:53:19+5:302019-08-05T09:53:39+5:30
कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी साधारणत: २० ते २२ तास लागतात.
सांगली : कृष्णा पाणलोट क्षेत्रात अद्यापही जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना, वारणा, धोम, कण्हेर या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठाला महापुराचा धोका कायम आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी आज, सोमवारी सकाळी सहा वाजता ४४ फूट झाली आहे. ४५ फूट ही धोका पातळी आहे.
कोयना धरणातून सोडलेले पाणी सांगलीत पोहोचण्यासाठी साधारणत: २० ते २२ तास लागतात. सध्या कोयना धरणातून ९० हजार क्युसेक्स प्रति सेकंद पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी उद्या पहाटेपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यातच पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येत आहे. त्यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज पालकमंत्री सुभाष देशमुख भिलवडी आणि सांगली येथे पूरग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करणार आहेत महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा, शिराळा या तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे.
सांगली महापूर अपडेट
बायपास पुलावरून वाहतूक बंद, आयर्विन पुलावरूनही फक्त अत्यावश्यक वाहतूक सुरू
सोमवारी पहाटेपासून रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. पूरपट्ट्यातील अनेक उपनगरे पाण्याखाली
पहाटेच्या सुमारास कृष्णाकाठावरील सिध्दार्थ परिसरात पाणी शिरले
पाठोपाठ कर्नाळ रस्त्यावरचा शिवशंभो चौकही पाण्याखाली
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बायपास पुलावरून वाहतूक पहाटेपासून बंद केली आहे
सांगलीवाडीमार्गे ये जा करणारी वाहतूक ठप्प झाली आहे
कोयनेतून अद्यापही ९० हजार क्यूसेक विसर्ग सुरूच असल्याने महापुराचा सांगलीसह जिल्ह्याला अधिक धोका वाढणार आहे
सोमवारी पहाटे ड्रेनेज चेंबरमधून बँकवॉटरने महापूर सांगलीत दाखल झाला
बायपास पुलाचा शिवशंभो चौक पाण्याखाली गेल्याने सांगलीवाडीमार्गे पुलावरून सर्व वाहतूक बंद