खानापूर तालुक्यामध्ये दुष्काळाचे उग्र रूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:46 PM2019-02-03T23:46:55+5:302019-02-03T23:47:00+5:30
दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात ...
दिलीप मोहिते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सांगली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी परिसरात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. या गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या असून दुष्काळी उपाययोजनेचा भाग म्हणून केवळ टॅँकरच्या दीड खेपा दिल्या जात आहेत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांमधून प्रशासन व राज्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खानापूर तालुक्याच्या पूर्व भागातील घाटमाथ्यावरील बाणूरगड हे सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव. अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असलेल्या या गावातील लोकांवर गेल्या तीन वर्षांपासून वरूणराजाही कोपला आहे. सुमारे सोळाशे ते सतराशे लोकसंख्या असलेल्या बाणूरगड, ताडाचीवाडी व कुसबावडे परिसरात जनावरांची संख्या आठशे ते नऊशेच्या आसपास आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत उंचावर असलेली ही तीन गावे सध्या तरी कोणत्याच जलसिंचन योजनेच्या आराखड्यात समाविष्ट नाहीत. त्यामुळे या परिसरात शेतीसह पिण्याचा पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पाऊस नसल्याने शेती भकास झाली आहेच, शिवाय पिण्याचा पाणी प्रश्नही सध्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागला आहे. बाणूरगड गावात चार ते पाच शिवकालीन विहिरी, तीन कूपनलिका आहेत. परंतु, त्यात चिमणीला पिण्याइतकेही पाणी नाही. प्रशासनाने टॅँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी, केवळ दीड खेप म्हणजे १५ हजार लिटर पाणी गावाला दिले जात आहे. टॅँकरच्या खेपा वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी आजही प्रलंबित असून, त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाने जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे पशुधन धोक्यात आले असून, चाºयाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. परिणामी, येथील लोकांवर स्थलांतराची वेळ आली आहे. बाणूरगड, ताडाचीवाडी, कुसबावडे परिसरातील भीषण दुष्काळाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत पडल्याने पाण्याची व्यवस्था तातडीने करणे गरजेचे बनले आहे. पाणी व चारा न मिळाल्यास येथील लोकांवर जीवापाड जपलेली मूक जनावरे कवडीमोल किंमतीला विकावी लागणार आहेत. तरीही ग्रामस्थांसमोरील प्रश्नांची गर्दी थांबणार नाही.
परिसरातील भीषण परिस्थितीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने पहावे, अशी आर्त हाक बाणूरगड परिसरातील दुष्काळग्रस्तांनी दिली आहे.
प्रशासन, नेत्यांकडून दुष्काळी भाग दुर्लक्षित
गेल्या चार वर्षांपासून बाणूरगड परिसरात पाऊस पडला नाही. परिणामी, चारा उत्पन्न झाले नाहीच, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न यावर्षी मोठ्या प्रमाणात गंभीर बनला आहे. शासनाकडे टॅँकरच्या खेपा वाढवून देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. परंतु, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आमच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे चाºयाअभावी पशुधन धोक्यात आले आहे. चाºयासाठी जनावरे गोठ्यात हंबरडा फोडत आहेत. पण त्यांच्याकडे केवळ पाहत बसण्याशिवाय लोकांपुढे पर्याय उरला नसल्याचे बाणूरगडचे सरपंच सज्जन बाबर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.