पुराच्या पाण्यात पडताहेत धोकादायक उड्या...। एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:57 AM2019-08-04T00:57:21+5:302019-08-04T00:58:30+5:30
केवळ सोशल मीडियावरील दिखावूपणा करण्यासाठी धोकादायक उड्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न प्रशासनासाठी तसेच पालकांसाठी चिंतेचा बनला आहे.
सांगली : पोहण्याचे शास्त्रशुद्ध ज्ञान असलेल्या व सराव असलेल्या तरुणाईचा पुराच्या पाण्यात पोहण्याचा आनंद, साहस एकीकडे दिसत असताना, दुसरीकडे या गोष्टींचे अनुकरण करीत केवळ सोशल मीडियावरील दिखावूपणा करण्यासाठी धोकादायक उड्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे हा प्रश्न प्रशासनासाठी तसेच पालकांसाठी चिंतेचा बनला आहे.
सांगलीत २00५ व २00६ मध्ये आलेल्या महापुरातही अनेक तरुणांनी आयर्विन पुलावरून उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटला होता. त्यांचे हे साहस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही होत होती, मात्र हे तरुण सांगलीतील पट्टीचे पोहणारे म्हणून ओळखले जातात. सांगलीच्या नदीपात्राचे भौगोलिक ज्ञानही त्यांना आहे. त्यामुळे पाण्याला कुठे ओढ आहे, त्याचा वेग किती असेल आणि पोहण्याची पद्धती कुठली ठेवायची, अशा गोष्टींचे गणित बांधून हे जलतरणपटू हा साहसी खेळ करीत असतात, मात्र त्यांचा खेळ पाहून पोहण्याचे अल्पज्ञान असलेली मुलेही पुराच्या पाण्यात चित्रीकरण करण्यासाठी उड्या मारताना दिसत आहेत. सांगलीत गेल्या दहा दिवसांपासून असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोबाईलवर चित्रीकरण करीत या धोकादायक उड्या घेतल्या जात आहेत.
सांगली जिल्ह्यात बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर प्रतीक पोपट आवटे (वय १८, मूळ रा. आमणापूर, ता. पलूस, सध्या यल्लम्मा चौक इस्लामपूर) हा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. सोशल मीडियावर टाकण्यासाठी साहसी व्हिडिओ बनविण्याच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे दिसून आले. अशाप्रकारचा धोका पत्करून सांगलीच्या आयर्विन पुलावरूनही उड्या मारल्या जात आहेत, मात्र त्यात पुरात पोहण्याचे ज्ञान असणारे फार कमी आहेत. याठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी ती घडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पुराच्या पाण्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे याठिकाणी उडी मारणे ही जिवाशी खेळण्यासारखे असते. यापूर्वीच्या महापुरातही पोहताना वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या. नदीकाठावर प्रशासकीय यंत्रणेमार्फत नियंत्रण नसल्याने या घटनांमधून आणखी बळी जाण्याचाही धोका संभवत आहे.
प्रशासकीय यंत्रणेचे स्टंटबाजीकडे दुर्लक्ष
सांगलीच्या आयर्विन पुलावरून तरुण-तरुणी पुराच्या पाण्यात उड्या मारत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा याठिकाणी उपलब्ध नाही. आपत्ती निवारस केंद्राकडून त्यांच्या चौकटीतील कार्य सुरू असले तरी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा चित्रीकरणासाठी पडणाऱ्या उड्या रोखणे गरजेचे आहे. आजपर्यंत अशी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नव्हती, मात्र आता अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी प्रयत्न चालू झाल्याचे समजते. बºयाचठिकाणच्या समुद्रकिनारी पोहणाºया लोकांवर नियंत्रण ठेवले जाते त्याप्रमाणे नियंत्रणाची मागणी होत आहे.
सांगली शहरात पोहण्यात पारंगत असलेले अनेक तरुण, तरुणी आहेत. त्यांना पुराच्या पाण्यात कोणत्या पद्धतीने पोहायचे याचे ज्ञान आहे. मात्र काही तरुण पुराच्या पाण्याची माहिती नसतानाही उड्या मारताना दिसत आहेत. शर्ट-पॅँटवर किंवा आहे त्या वस्त्रांवर पोहण्याची चूक ते करीत आहेत. अशा गोष्टी जिवावर बेतू शकतात. त्यामुळे ज्यांना नदीची भौगोलिक माहिती नाही, त्यांनी असे साहस करू नये.
- संजय चव्हाण, जलतरणपटू, सांगली