पाण्याअभावी डाळिंब बागा उद्ध्वस्त
By admin | Published: August 24, 2016 10:55 PM2016-08-24T22:55:54+5:302016-08-24T23:43:05+5:30
जत तालुक्यातील स्थिती : शेतकरी संकटात; पाच वर्षांपासून पाऊस नाही
गजानन पाटील -- संख --भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील २ हजार एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. मान्सून पावसाने ही दडी दिल्याने डाळिंब बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. दोन वर्षापासून बिब्ब्या रोगाने बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच गेल्या पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. यामुळे डाळिंब, बागायत शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक पाण्याचे संकट उभा राहिल्याने अक्षरश: शेतकरी देशोधडीला लागला आहे. बँका, विकास सोसायट्यांकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनुकूल हवामान, कमी पाणी व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक आहे. ठिबक सिंचन, शेत तलाव बांधून, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, कुंभारी, उमदी, आसंगी (जत) जाडरबोबलाद, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर या गावांमध्ये डाळिंब क्षेत्र अधिक आहे.
तालुक्यात २६ पाटबंधारे तलाव व २ मध्यम प्रकल्प आहेत. पाऊस बऱ्यापैकी पडत असल्याने पाणी टंचाई नव्हती. ४०० ते ५०० फुटापर्यंत पाणी लागत होते. अनेक शेतकऱ्यांनी तलावातून, तलावाशेजारी, ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून पाणी आणले. मात्र २०१० पासून सलग पाच वर्षे पाणी कमी झाल्याने तलाव, विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या. यावर्षी तर पाऊसच झाला नसल्याने १९७२ पेक्षा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.
जानेवारी महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. रब्बी व खरीप हंगाम सलग दुसऱ्यावर्षी वाया गेला होता. मार्च-एप्रिलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक पाणी टंचाई गावामध्ये निर्माण झाली होती. तालुक्यातील ८१ गावांमध्ये त्याखालील ३४२ वाड्या-वस्तीवर टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. पिण्याच्या पाण्याची भीष0ण टंचाई, शेतीच्या पाण्याची तर आडात नाही, तर पोहऱ्यात येणार कोठून? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पाण्याअभावी बागा पूर्णपणे वाळून गेल्याने बागांचे फक्त सांगाडे राहिले आहेत. थोडाफार झालेल्या पावसाने वाळलेल्या झाडांना फक्त पालवी फुटली आहे. परंतु त्या बागाचे आयुष्य कमी होते. रोगप्रतिकारशक्ती घटते. उत्पादन क्षमताही कमी होते.
शेतकऱ्यांना बागा उभा करण्यासाठी तालुक्यातील विकास सोसायटीने कोट्यवधी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. पूर्व भागातील दरीबडची, जालिहाळ खुर्द, आसंगी, सोन्याळ, उटगी, जाडरबोबलाद, मुचंडी, दरीकोणूर येथील विकास सोसायटीने २० कोटींपर्यंत कर्ज दिले आहे. बागा जळल्याने शेतकरी अडचणीत आल्याने शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयाची येणे बाकी असल्याने विकास सोसायट्या अडचणीत आल्या आहेत.
बागेचे आर्थिक उत्पन्न संपल्याने साठवण ठेवलेल्या पैशावर उदरनिर्वाह सुरू आहे. दुष्काळी सवलत देऊन बँका, विकास सोसायटीची कर्जे माफ करावीत व परत बागा उभ्या करण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.
मजुरांचे स्थलांतर : उचल घेण्याची वेळ
पावसाने यंदाही जत तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. परिसरात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने डाळिंब, द्राक्षबागेत काम करणाऱ्या मजुरांना आता रोजगार हमीच्या कामावर जावे लागत आहे. सर्वांना शेतात काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोल्हापूर, सांगली, वाळवा, सातारा आदी ठिकाणी मजुरांनी स्थलांतर केले आहे. ते वीटभट्टीवर काम करू लागले आहेत. गाव सोडून नदीकाठचा आधार घेतला आहे. बागा वाळून गेल्याने ऊसतोडी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बागेसाठी व पाईपलाईनसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ऊसतोडी, वीटभट्टी कंत्राटदारांकडून उचल घेण्याची वेळ आलेली आहे.