बिबट्यांची चांदोलीबाहेर भटकंती धोक्याची : तीन तालुक्यांमध्ये घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:06 AM2020-01-17T00:06:52+5:302020-01-17T00:08:16+5:30
जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.
गंगाराम पाटील ।
वारणावती : चांदोली अभयारण्य व जंगलातील भुकेले बिबटे खाद्यासाठी प्रकल्प क्षेत्राबाहेर फिरू लागले आहेत. अभयारण्याशेजारील शिराळा, पाटण व वाळवा तालुक्यामध्ये वारंवार त्यांचे दर्शन होऊ लागले आहे. त्यामुळे बिबट्यांच्या भटकंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही भटकंती बिबट्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. गेल्या दहा वर्षात अभयारण्याबाहेर सात, तर अभयारण्यात दोन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने बिबट्यांच्या रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
जंगल परिसर विरळ होणे, अभयारण्यात हरीण, काळवीट व अन्य खाद्य उपलब्ध नसणे, अशा प्रकारांमुळे बिबटे सैरभैर होत असून, त्याचा फटका मानवी वस्त्यांना बसू लागला आहे. बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात.
आपल्या घराजवळ राहून आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. अशातच अभयारण्याबाहेर पडलेले बिबटे पुन्हा अभयारण्यात फिरकलेच नाहीत. मादी बिबट्याने उसाच्या शेतात पिलांना जन्म दिला की, त्यांचा वावर तेथील परिसरातच असतो. त्यांना तोच आपला अधिवास आहे असे वाटते.
बिबट्यांच्या भटकंतीबरोबर त्यांच्या अपघाती तसेच नैसर्गिक मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. काही चोरट्य शिकारीमुळे, काही विषबाधा झाल्याने, तर काही अपघात झाल्याने बिबट्यांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे आता वन विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन बिबट्यांविषयी गावा-गावात जनजागृती करणे, त्यांच्याविषयीची भीती दूर करणे, बिबट्यांच्या सवयी, आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करुन बिबट्या व मानव या दोघांचेही संरक्षण करण्याची गरज आहे.
- उद्यानात सोय व्हावी
गाव परिसरामध्ये भटकी जनावरे असतात. बिबट्यांना ही भटकी जनावरे सहजासहजी भक्ष्य म्हणून उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक बिबटे मानवी वस्त्यांकडे येतात. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवणे आणि भटक्या जनावरांचा बंदोबस्त, हाच बिबट्याला नागरी वस्तीत फिरकू न देण्याचा उपाय आहे. तसेच त्यासाठी वनाच्छादित क्षेत्र वाढविणे, खाद्यान्न उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे.
- वन विभाग सुस्त
बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात वन विभागाकडून पिंजरा लावण्यापलीकडे काहीच केले जात नाही. बिबट्या दिसल्यावर कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जात नाही. तसेच नागरिकांना मार्गदर्शनही केले जात नाही.