दरेकर म्हणाले महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचे, चुक लक्षात येताच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 05:04 PM2021-11-30T17:04:24+5:302021-11-30T17:08:03+5:30
महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली.
सांगली : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधकांनी आघाडीसरकारच्या कामावर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. इतकच नाही तर हे सरकार एका महिन्यात पडेल, येत्या काही दिवसात पडेल अशी भाकितही विरोधी भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी केली. यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री रामदास आठवले यांनीही गेल्या दोनच दिवसापुर्वी असे भाकित केले होते. असेच काहीसे सरकार कोसळणार असल्याचे भाकित करीत असताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चुक झाली.
प्रवीण दरेकर आज सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करत असताना यांच्या तोंडून पाच वर्षात या सरकारने काहीही केले नाही, अशी टीका केली. पत्रकार व स्थानिक नेत्यांनी चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ‘स्लीप ऑफ टंग’ झाल्याचे सांगत हे सरकार दोन वर्षाचे असून ते लवकरच पडणार असल्याचे सांगितले. माझ्या तोंडून जरी चुकून पाच वर्षाचे सरकार संबोधले गेले असले तरी हे सरकार काही पाच वर्षे टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.