जिल्ह्यात सौरदिव्याखाली पसरला अंधार!

By admin | Published: May 4, 2016 11:09 PM2016-05-04T23:09:47+5:302016-05-05T00:25:26+5:30

दोन वर्षात दोन कोटीचा खर्च : गावोगावच्या दिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

The darkness spread under the solar system in the district! | जिल्ह्यात सौरदिव्याखाली पसरला अंधार!

जिल्ह्यात सौरदिव्याखाली पसरला अंधार!

Next

अशोक डोंबाळे -- सांगली--दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या विजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर वाढावा, यासाठी शासनाने गावा-गावात विविध योजनांतर्गत सौरदिवे बसविले आहेत. मात्र प्रशासनाकडून देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक गावातील बहुतांशी दिवे बंद आहेत. त्यामुळे दोन वर्षात सौरदिव्यांवर झालेला दोन कोटीचा खर्च ठेकेदारांना पोसण्यासाठी केला का?, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पर्यावरण संतुलनप्रणित मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपारंपरिक स्रोतातून निर्माण केलेल्या विजेचा गावा-गावात पुरवठा व्हावा, या उद्देशाने ग्रामीण भागातील रस्त्यांवर सौरपथदिवे खांब उभारण्याची योजना कार्यान्वित केली. ग्रामीण भागातील विजेची टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनीही सौरदिव्यांना प्राधान्य देऊन मागणी केली होती. जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग, समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना सौरदिवे दिले आहेत. कृषी विभागाकडून २०१४-१५ वर्षात ४९ लाख ८८ हजार ८८० रुपयांचा निधी खर्च करून २६० सौर पथदिव्यांचा पुरवठा केला होता. याचवर्षी ३३ लाख ८१ हजार ५८८ रुपये किमतीच्या १६२ सौर अभ्यासिकांचा पुरवठा केला आहे.
वास्तविक सौरपथदिवे आणि सौर अभ्यासिकांचा दर्जा तपासून खरेदी करण्याची गरज होती. ठेकेदाराने पुरवठा केल्यानंतर काही दिवस त्यांनीच देखभाल व दुरुस्ती करायची आहे. पण, याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष करूनही त्याबाबत कारवाई झाल्याचे दिसत नाही. योजनेंतर्गत ग्रामीण भागासोबतच काही तीर्थक्षेत्रे व ऐतिहासिक स्थळांवर सौरदिवे बसविले आहेत. मात्र, सध्या यातील काहींच्या बॅटऱ्या गायब आहेत, तर काही ठिकाणच्या बॅटऱ्या नादुरुस्त झाल्यामुळे दिवे बंद आहेत.
या चोऱ्यांबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करूनही त्याचा तपास लागत नसल्याचे ग्रामपंचायतींकडून सांगण्यात येत आहे. यामुळे सध्या अनेक सौरपथदिवे बंद अवस्थेत असूनही त्याकडे पुरवठादारांचे लक्ष नाही. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सौरपथदिवे पुरवठा झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायतींनी करायची आहे, असे सांगून ठेकेदाराचीच पाठराखण केली जात असल्याचे दिसत आहे.
पूर्वीचा हा अनुभव असताना २०१५-१६ मध्ये तरी सौरपथदिवे खरेदी करताना त्यांचा दर्जा तपासण्याची गरज होती. पुरवठादारांकडून दर्जाबाबतची हमी घेण्याची गरज होती. परंतु तसे झाल्याचे दिसत नाही. यावर्षी पुन्हा ४८ लाख ८८ हजार ८८० रुपये निधी खर्च करून २६० सौरपथदिव्यांचा ग्रामपंचायतींना पुरवठा केला. सहा महिन्यांत यातील ३० टक्के सौरपथदिवे बंद पडल्याच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारी आहेत. जे दिवे चालू आहेत, त्यांचा उजेडही व्यवस्थित पडत नाही. काही सौर पथदिवे चांगले असल्याच्या सरपंचांच्या प्रतिक्रिया आहेत. सौरपथदिव्यांशिवाय ४९ लाख ९९ हजार २० रुपये निधीतून दोन हजार ९५८ ऊर्जा कार्यक्षम पथदिव्यांची खरेदी केली. अधिकाऱ्यांनी साहित्य खरेदीपेक्षा पुरवठा होणाऱ्या वस्तूंच्या दर्जाकडेही उघडे डोळे ठेवून पाहण्याची गरज असल्याच्या सदस्यांच्या प्रतिक्रिया आहेत.


बॅटऱ्या चोरीला : अनेक ठिकाणच्या घटना
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे बारा सौरदिवे बसविण्यात आले असून, यातील सहा दिवे बंद आहेत. येथील बॅटऱ्या, पॅनेलच चोरीला गेल्याचे सरपंच संग्राम गायकवाड यांनी सांगितले. पुन्हा येथे आम्ही सौरदिवे बसविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. याचपध्दतीने कासेगाव येथीलही एक बॅटरी चोरीला गेली असून, दोन युनिट बंद आहेत. खानापूर, तासगाव, मिरज, आटपाडी तालुक्यातील गावांमधीलही अनेक सौरदिव्यांच्या बॅटऱ्या, खांब गायब झाल्याच्या तक्रारी आहेत. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार होत आहेत.

Web Title: The darkness spread under the solar system in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.