कौतुकास्पद! इंटरनेटवर पाहून तरुणाने साकारला प्रतापगड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 03:31 PM2019-10-29T15:31:31+5:302019-10-29T15:37:17+5:30
सांगलीच्या माधवनगर रोडवरील शिवोदयनगर येथील दर्शन सुरेश बंडगर याने इंटरनेटच्या माध्यमातून यापूर्वी अनेक कलाकृती साकारल्या आहेत.
सांगली - इंटरनेटवर गेम्स्, करमणुकीचे व्हिडिओ पाहून त्यात तल्लीन झालेल्या शाळकरी मुलांच्या गर्दीत या आधुनिक माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करून स्वत: घडविण्याचे काम काही मुले करीत आहेत. सांगलीतील एका तरुणाने इंटरनेटचा वापर करून हुबेहुब प्रतापगड साकारला आहे. दिवाळीनिमित्त त्याने हा गड साकारल्यानंतर तो पाहण्यासाठी बाल-अबाल वृद्धांची गर्दी होऊ लागली आहे.
सांगलीच्या माधवनगर रोडवरील शिवोदयनगर येथील दर्शन सुरेश बंडगर याने इंटरनेटच्या माध्यमातून यापूर्वी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. त्यातच यंदा दिवाळीत त्याने साकारलेला प्रतापगड लक्षवेधी ठरला आहे. तब्बल दहा दिवस त्याने दिवसातील 12 तास खर्ची घालून मोठा किल्ला साकारला. 220 विटा, एक पोते सिमेंट, 10 पोती माती वापरून त्याने प्रतापगड साकारला. प्रतापगडावरील सर्व बारकावे त्याने इंटरनेटवरून टिपले.
किल्ल्यावर त्याने सैनिक उभारताना इंच-दीड इंचाचे सैनिक कवलापूर येथील कुंभारांकडून तयार करून घेतले. त्यामुळे किल्ल्याची भव्यता त्यातून स्पष्ट होते. टेहळणी बुरुज, महादरवाजा, दींडी दरवाजा, रेडका बुरुज, यशवंत बुरुज, सूर्य बुरुज, केदारेश्वर मंदिर, हनुमान मंदिर अशा सर्व गोष्टींचा समावेश करताना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव, गावगाड्याचे चित्र त्याने याठिकाणी साकारले आहे.