औदुंबरमध्ये दत्त जयंती साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:35 AM2020-12-30T04:35:57+5:302020-12-30T04:35:57+5:30
अंकलखोप : ‘दिगंबरा, दिगबंरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचला औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त जन्मकाळ साधेपणाने साजरा ...
अंकलखोप : ‘दिगंबरा, दिगबंरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरामध्ये मंगळवारी सायंकाळी साडेपाचला औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त जन्मकाळ साधेपणाने साजरा झाला. यावेळी मंदिर परिसरामध्ये केवळ पुजारी, देवस्थानचे विश्वस्त, सेवेकरी व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दत्त जयंती उत्सवावर निर्बंध घातले होते. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांविना रिकामा होता. श्री दत्त सेवाभावी मंडळाच्यावतीने मंदिर फुलांनी सुशोभित केले होते.
पहाटे पाचपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. यात पाच वाजता काकड आरती, सहाला मंगल आरती, सात ते १२ अभिषेक, १२ ते दोन महापूजा, महाआरती, चारला जन्मकाळाचे कीर्तन झाले. भाविकांविना कीर्तन व पाळणा कार्यक्रम झाला. सायंकाळी सातला पालखी सोहळा झाला.
औदुुंबरमध्ये येणारे चारही रस्ते भाविकांविना रिकामे होते. औदुंबर फाटा येथे सर्व रस्ते बंद केल्याने वाहनांची गर्दी झाली नाही. दुपारी सांगलीच्या लिओ श्वानाच्या मदतीने मंदिर परिसराची तपासणी करण्यात आली. काही भाविक मंदिर परिसराजवळ जाण्यास परवानगी मिळावी यासाठी पोलिसांसोबत हुज्जत घालत होते. परिसरातील व्यापारी लॉकडाऊननंतर दत्त जयंती उत्सवाला व्यवसाय चांगला होईल, या अपेक्षेत होते, पण भाविकांना प्रवेशबंदी केल्यामुळे व्यवसाय बंद ठेवण्यात आले.
खा. संजयकाका पाटील, पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार श्रीनिवास ढोणे, संग्रामसिंह देशमुख यांनी दर्शन घेतले. अंकलखोप ग्रामपंचायतीने पाण्याची व विजेची व्यवस्था केली होती. सरपंच अनिल विभूते व देवस्थान समितीचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य नियोजनात होते. भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग यांच्यासह ६० पोलिसांचा बंदोबस्त होता.
फोटो : २९१२२०२० औदुंबर ०१ : औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मूर्ती,
फोटो : २९१२२०२० औदुंबर ०२ : औदुंबर (ता. पलूस) येथे दत्त जयंतीस प्रवेशबंदीमुळे दुकाने बंद होती. त्यामुळे मंदिर परिसर ओस पडला होता.