दत्ताकाकांच्या निधनाने स्वच्छतेचा नंदादीप मालविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:27+5:302021-07-19T04:18:27+5:30
युनुस शेख लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहराच्या मुख्य व्यापार पेठेतील गांधी चौक ते टिळक चौक परिसराची तब्बल ५० ...
युनुस शेख
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहराच्या मुख्य व्यापार पेठेतील गांधी चौक ते टिळक चौक परिसराची तब्बल ५० वर्षे स्वच्छता करणारे दत्तात्रय खंडेराव जाधव (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तब्बल दोन पिढ्यांना साक्षी ठेवत आपल्या भोळ्याभाबड्या स्वभावाने आणि सेवा वृत्तीने मोलमजुरी करणाऱ्या दत्ताकाकांची ही एक्झिट परिसरातील प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी ठरली. एका अर्थाने या परिसराची स्वच्छता करणारा नंदादीप दत्ताकाकांच्या निधनाने निमाला आहे.
दत्ताकाका या नावाने व्यापारी पेठेत ते प्रसिद्ध होते. प्रत्येकाच्या दुकानासमोरचा रस्ता झाडून त्यावर पाणी मारून प्रत्येकाचे अंगण सजविण्यात दत्ताकाकांनी आपली हयात घालविली. काम करताना पैशांची अपेक्षा न ठेवता प्रति गाडगेबाबांच्या सेवाव्रती धर्माने त्यांनी कष्टाची पूजा बांधली. गांधी चौक ते टिळक चौकापर्यंतचा सगळा परिसर दत्ताकाकांच्या कष्टाने स्वच्छतेची झालर पांघरलेला असायचा.
दिवसभराच्या काबाडकष्टाने दत्ताकाका थकून जात असत. अशा वेळी गांधी चौकातील सर्वच हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी चहापान, नाष्ट्याची व्यवस्था असायची. त्यातूनही ते येणा-जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बोबड्या बोलीने रुपया-दोन रुपये मागायचे. त्यांचा हा दिवसभराचा अखंड राबता प्रत्येकाच्या अंगवळणी पडलेला होता.
गांधी चौक ते टिळक चौक या परिसरात दत्ताकाका हे आपल्या स्वच्छतेच्या कामातून सदैव स्मरणात राहतील, अशीच नाती त्यांनी आयुष्यभर जोडून ठेवली होती. त्यांच्या जाण्याने स्वच्छतेचा नंदादीप मालवला आहे. ज्येष्ठ गुरुवर्य वसंतराव जाधव यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.