मुलांना मारून दाम्पत्याची आत्महत्या

By admin | Published: December 29, 2015 12:44 AM2015-12-29T00:44:43+5:302015-12-29T00:52:45+5:30

बनेवाडीतील घटना : सावकारांच्या त्रासाला कंटाळून केले कृत्य; दोन मुलांचा गळा आवळून घेतला गळफास

Daughters of suicide by killing children | मुलांना मारून दाम्पत्याची आत्महत्या

मुलांना मारून दाम्पत्याची आत्महत्या

Next

बोरगाव : बनेवाडी (ता. वाळवा) येथील दाम्पत्याने स्वत:च्या दोन मुलांचा गळा आवळत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. खासगी सावकारांच्या त्रासामुळेच दाम्पत्याने हे कृत्य केल्याचे प्रथमदर्शनी पुढे येत आहे. संजय भीमराव यादव (वय ५0), पत्नी जयश्री यादव (३०), मुलगा राजवर्धन यादव (४) व मुलगी समृद्धी यादव (४ महिने) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
बनेवाडी येथील संजय यादव गावातील काही शेतकऱ्यांची शेती वाट्याने करीत होते, तर त्यांची पत्नी जयश्री टेलरिंग व्यवसायासह शेतीची कामे करीत होत्या. काही महिन्यांपूर्वी ताकारी येथे बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी यादव यांनी बोरगावसह इतर गावच्या सावकारांकडून कर्ज घेतले होते, परंतु त्या व्यवसायात त्यांना मोठा तोटा झाला. परिणामी त्यांना सावकारांचे कर्ज चुकविता आले नाही. कर्जाची रक्कम वाढतच चालली होती. त्यामुळे सावकारांनी पैसे परत मिळण्यासाठी यादव यांच्याकडे तगादा लावला होता. या तगाद्याला कंटाळूनच यादव यांनी प्रथम दोन कोवळ्या मुलांना गळा आवळून ठार मारले. त्यानंतर पत्नीसह स्वत: घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली.
यादव गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे नदीकाठी राहत होते. ते दररोज नदीवर पोहण्यासाठी जात असत. त्यांच्यासोबत पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी सोमवारी सकाळी सहा वाजता घराचे दार ठोठावले, परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सात वाजता नळाला पाणी आल्यानंतर शेजारच्या महिलांनी जयश्री यांना हाक मारून उठविण्याचा प्रयत्न केला. काहींनी खिडकीतून आत डोकावले असता त्यांना जयश्री यांचा मृतदेह घराच्या तुळईला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत असल्याचे दिसले. ही घटना पाहिल्यानंतर महिलांनी आरडाओरडा केला. आत जाऊन पाहिले असता संजय यादव यांचाही मृतदेह आढळून आला, तर त्यांची दोन्ही मुले अंथरुणावरच निपचित पडल्याचे दिसून आले. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलीसपाटील पोपट तुकाराम साटपे यांनी इस्लामपूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ राठोड पथकासह दाखल झाले. वैद्यकीय पथकाला बोलाविण्यात आले. यादव यांनी दोन्ही मुलांना गळा आवळून मारल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून संजय यादव यांनी लिहिलेली सावकारांच्या नावाची पाटी तसेच एक चिठ्ठी ताब्यात घेतली. श्रीमती शिंदे यांनी घटनेबाबत ग्रामस्थांकडून तपशीलवार माहिती घेत तपासकामी सूचना केल्या. (वार्ताहर)
मित्र, नातेवाइकांना धक्का
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सासूरवाडी पडवळवाडी येथे जाऊन संजय यादव यांनी सोयाबीनचे बियाणे आणले होते. तेथे नातेवाइकांशी मनमोकळेपणे बोलून ते परतले होते. थंडीचा कडाका वाढल्याने रविवारी रात्री दहापर्यंत शेकोटी करून ते मित्रांसमवेत शेकत बसले होते. मित्रांसोबत गप्पाही रंगल्या होत्या. ते असे कृत्य करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर मित्रांचाही त्यावर विश्वास बसला नाही. नातेवाइकांनाही या घटनेचा धक्का बसला.
पाटीवरील मजकूर...
घटनास्थळी संजय यादव यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पाटीवर चार सावकार आम्हाला मारणार आहेत, त्यांची चौकशी करावी, तर दुसऱ्या बाजूला पाटणकर आप्पा (बोरगाव) यांनी खूप त्रास दिला, असे नमूद केले आहे.
दुसरी घटना : दहा वर्षांपूर्वी पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन मारल्याचा गुन्हा संजय यादव यांच्यावर होता. त्यातून ते एक वर्षापूर्वी निर्दोष मुक्त झाले होते. सोमवारी घडलेल्या या घटनेने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

Web Title: Daughters of suicide by killing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.