निकोप राजकारणाचा अरुणोदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:09+5:302020-12-08T04:24:09+5:30

क्रांतिअग्रणी जी. डी.बापू लाड, क्रांतिवीरांगणा विजया लाड यांच्या विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या अरुणअण्णांना सुजाण पदवीधरांनी भरघोस पाठबळ ...

The dawn of Nikop politics | निकोप राजकारणाचा अरुणोदय

निकोप राजकारणाचा अरुणोदय

Next

क्रांतिअग्रणी जी. डी.बापू लाड, क्रांतिवीरांगणा विजया लाड यांच्या विचारांचा वारसा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या अरुणअण्णांना सुजाण पदवीधरांनी भरघोस पाठबळ देऊन आपल्या समस्या निश्चितपणे सोडविण्यासाठी संधी दिली.

गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ अखंडपणे समाजातील सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि एकूणच समाजासाठी त्यांचे लढणे सुरू आहे. कृषी, सहकार, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आदी क्षेत्रात सातत्याने सुरू असलेली चळवळ सर्वश्रुत आहे. अण्णांच्या वागण्यातला साधेपणा, मनातला निर्मळपणा, डोळ्यातला शुद्ध आणि सात्त्विक भाव, धमण्यांमधली क्रांतिकारी विचारांची सुप्त ज्योत सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या जीवनामध्ये किती अमूलाग्र बदल घडवू शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अरुणअण्णा होय.

जी. डी. बापू लाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. प्रारंभापासूनच विविध पातळ्यांवर मोठा संघर्ष, न्यायालयीन लढाई जिंकून या कारखान्याची उभारणी झाली. जी. डी. बापू लाड यांचे स्वप्न अरुणअण्णांच्या नेतृत्वाखाली सत्यात उतरले. आपण कारखान्याचे मालक नाही, तर विश्वस्त आहोत, कुंपण बनून शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे रक्षण करायचे, या जी. डी. बापूंच्या तत्त्वानुसार सर्व कार्यप्रणाली त्यांनी अंगिकारली. विक्रमी गाळप, रिकव्हरी, उसाला उच्चांकी दर, साखर उद्योगाला पूरक असणाऱ्या प्रकल्पांची निर्मिती असो की, त्याचे कुशल व्यवस्थापन, या सर्वच बाबींवर कारखाना नेहमी एक नंबरवर राहिला आहे. पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ७१ गावे व लगतची १० गावे अशा ८१ गावांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी अर्थक्रांती निर्माण झाली.

कारखाना शेतकरी व सभासद वर्गासाठी राबवित असलेल्या विविध कार्यशाळा, उद्बोधनपर उपक्रमांच्या माध्यमातून एकरी उसाचे उत्पादन दुपटीने वाढले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ९२ टक्के इतका ऊस उपलब्ध होऊ लागला. पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून ऊस लागण केल्यापासून कारखान्याला गाळपासाठी जाईपर्यंत सर्व खर्चाची जबाबदारी कारखान्याने स्वीकारली. खऱ्याअर्थाने शेतकरी वर्गाचे पालकत्व स्वीकारून त्यांना आत्मनिर्भर बनविले गेले. अतिशय उत्तम व आदर्शपणे आपण सामान्य माणसांच्या हिताचे संवर्धन करू शकतो, याचा एक आदर्श नमुना अरुणअण्णांनी घालून दिला आहे. त्यामुळे कारखान्याचा नावलौकिक हा महाराष्ट्रामध्ये नव्हे, तर देशामध्ये पसरलेला आहे. त्यांच्या कार्यालयात सहज जरी डोकावले, तर बक्षिसे, पुरस्कारांची सन्मानचिन्हे यांची गर्दी दिसते. कामाची जाहिरात करण्यापेक्षाही कामाचा व्याप वाढवून त्यांनी अधिकाधिक उत्तम करण्यावर भर दिला.

क्रांती शिक्षण व उद्योग समूहातील कोणतीही शाखा पाहिली, तर एक सात्त्विक समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. अरुणअण्णांनी आयुष्यात मीतभाषी राहून लोकांची मने जोडण्याचे काम केले. जी. डी. बापूंनी पारतंत्र्याच्या कालावधीपासून स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त सामान्य माणसांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हितासाठी नुसता संघर्षच केला नाही, तर संधी मिळेल त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने झोकून देऊन आदर्श असे काम उभारून स्वप्नांची पूर्तता केली.

अरुणअण्णांनी या सर्व गोष्टींचे उत्तम नेतृत्व केले. अगदी सत्तरावा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यकर्त्यांच्या कल्पनेला

स्पष्टपणे त्यांनी नकार देणारे हे राजकारणातील पहिलेच नेतृत्व. शेवटी हट्टाला पेटलेल्या कार्यकर्त्यांना तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा असेल, तर तो समाजोपयोगी उपक्रमांनी करा, यावर अण्णा ठाम होते. यातून कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांत सत्तर हजार वृक्षांचे रोपण करून त्यांच्या संवर्धनाची मोहीम साकारली गेली. पर्यावरणाच्या रक्षणाचा नवा पायंडा त्यांनी निर्माण केला.

गेल्या पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी काही गावांत एसटी बसमधून प्रवास करणारे अण्णा... नावापुढे आमदार ही बिरुदावली लावण्यासाठी नव्हे, तर खऱ्याअर्थाने पदवीधरांच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले. निर्धारी सेवेचे, त्यागाचे राजकारण आता राहिले नाही. व्यापारी, सौद्याचे आणि भोगाचे राजकारण प्रबळ झाले. ही परंपरागत चालत आलेली चौकट पुणे पदवीधर निवडणुकीच्या निकालातून हद्दपार झाली. अरुणअण्णांच्या रूपाने उत्तम संघटनकौशल्य, सखोल अभ्यास आणि व्यापक जनाधार असलेल्या सालस, नीतिमान, चारित्र्यवान नेतृत्वावर पदवीधर मंडळींनी एक नंबरची साथ देऊन नवा क्रांतिकारी इतिहास घडविला आहे. पदवीधरांच्या सर्वांगीण प्रगतीचा, उन्नतीचा सर्वांर्थाने अरुणोदय झाला आहे.

- शरद जाधव, भिलवडी

Web Title: The dawn of Nikop politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.