पुढील महिन्यापासून शेतीसाठी दिवसा वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:11+5:302020-12-16T04:40:11+5:30
तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्री मिळणारी शेतीसाठीची वीज ही दिवसभरात मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयाला कुलूप लावून ...
तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्री मिळणारी शेतीसाठीची वीज ही दिवसभरात मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयाला कुलूप लावून आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या पुढाकाराने महावितरणचे अधिकारी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी पोलीस ठाण्यात बैठक झाली. बैठकीमध्ये पुढील महिन्यापासून शेतीसाठी दिवसा वीज पुरविण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा संघटनेतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसू, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दामाजी डुबल व ज्योतिराम जाधव यांनी दिला. यावेळी संघटनेचे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
फाेटाे : १५ तासगाव १
ओळ : शेतीसाठी दिवसा १२ तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, पोलीस प्रशासन व महावितरणच्या अधिकाऱ्यांची तासगाव पोलीस ठाण्यात बैठक पार पडली.