सांगली बाजार समितीत ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला

By admin | Published: June 28, 2015 12:43 AM2015-06-28T00:43:18+5:302015-06-28T00:44:08+5:30

बैठकीत निर्णय : जयंत पाटील, मदन पाटील, संजयकाकांची उपस्थिती

DCC 's formula in Sangli market committee | सांगली बाजार समितीत ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला

सांगली बाजार समितीत ‘डीसीसी’चाच फॉर्म्युला

Next

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पुन्हा एकदा जिल्हा बँकेचाच ‘फॉर्म्युला’ वापरण्याचा निर्णय राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांसह काँग्रेसचे मदन पाटील यांच्यातील बैठकीत घेण्यात आला. माजी मंत्री अजितराव घोरपडे मात्र बैठकीला अनुपस्थित होते. त्यांच्याबरोबर आघाडीत येण्यासाठी चर्चा करण्याचा निर्णयही झाला.
येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात शुक्रवारी रात्री उशिरा ही बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आदी उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमधील मदन पाटील गटाची आघाडी झाली होती. तीच आघाडी सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. जागा वाटपाचा निर्णय मात्र अद्याप झालेला नाही. येत्या दोन दिवसांत याला अंतिम स्वरूप देण्याचाही निर्णय झाल्याचे समजते. काही इच्छुकांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी येत्या चार दिवसांत अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
बैठकीला भाजपचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे अनुपस्थित होते. त्यांना बैठकीला बोलाविण्यात आले होते की नव्हते, याची मात्र माहिती मिळू शकली नाही. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी विलासराव शिंदे चर्चा करणार आहेत. घोरपडे यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भाजपच्या बैठकीत घोरपडेंची मनधरणी
जिल्हा बँकेतील बैठक संपल्यानंतर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला खा. संजय पाटील यांच्यासह अजितराव घोरपडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. विलासराव जगताप, शेखर इनामदार, आदी उपस्थित होते. या बैठकीत आघाडीसोबत येण्यासाठी घोरपडेंची मनधरणी करण्यात आली. जिल्हा बँक निवडणुकीत डावलल्याबद्दल घोरपडे यांनी नाराजी व्यक्त केली. घोरपडे यांनी अद्याप भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही. (प्रतिनिधी)

 

Web Title: DCC 's formula in Sangli market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.