सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ
By श्रीनिवास नागे | Published: October 10, 2022 11:48 AM2022-10-10T11:48:22+5:302022-10-10T11:48:52+5:30
ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा
सांगली : जत तालुक्यातील बिळूर येथील लिंगनूर तलावात काल, रविवारी मध्यरात्री आईसह तीन मुलींचे मृतदेह आढळून आले. सुनिता तुकाराम माळी (वय ३०), ऐश्वर्या तुकाराम माळी (८), अश्विनी तुकाराम माळी (९) व अमृता तुकाराम माळी (१२) अशी मृतांची नावे आहेत. ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पती तुकाराम माळी यास ग्रामस्थांनी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याची चर्चा आहे.
जत-बिळूर रस्त्यावर बिळूरपासून दोन किलोमीटरवर पूर्वेस सुतार वस्तीजवळ लिंगनूत पाझर तलाव आहे. या तलावालगतच माळी यांची वस्ती आहे. एवढी एकच वस्ती असल्यामुळे आसपास कोणीही नाही. तेथे तुकाराम माळी पत्नी व तीन मुलींसह राहत होता. तो दारूच्या आहारी गेल्यामुळे घरात पत्नीशी वारंवार खटके उडत. रविवारी दिवसभर संशयित तुकाराम माळी दारूच्या नशेत होता. नशेत वस्तीवरील काही जणांशी त्याचे भांडणही झाले होते. रात्री दारूच्या नशेत त्याने पत्नी व तीन मुलींना मारहाण करून तलावात ढकलून दिले असल्याची चर्चा आहे.
रात्री घरात कोणीच नसल्याचे पाहून शेजारच्या ग्रामस्थांनी या कुटुंबाची शोधाशोध सुरू केली. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुनिता व त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह तलावात तरंगत असलेले आढळून आले. संशयित तुकाराम माळी मात्र कोठेच आढळून आला नाही. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
सोमवारी सकाळी जत येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी आणण्यात आले. सकाळी दहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे बिळूर परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे.