मृतदेह विटंबना; आंबोळेंसह दोघेजण निलंबित
By admin | Published: November 5, 2014 11:58 PM2014-11-05T23:58:03+5:302014-11-06T00:03:06+5:30
आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, मुकादमाची वेतनवाढ रोखली
सांगली : मिरजेत झालेल्या बेवारस मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी आज, बुधवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व सफाई कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबित केले, तर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव व मुकादम मिलिंद शिंदे यांची वेतनवाढ रोखण्यात आली. या चौघांवर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मृतदेह विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनावरही ठपका ठेवला असून, त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
सांगलीतील दोन बेवारस मृतदेह पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मजुरांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कापडात गुंडाळून दिले जातात; मात्र बेवारस दोन्ही मृतदेह नग्नावस्थेत, शववाहिकेऐवजी कचरा उचलणाऱ्या गाडीतील कंटेनरमधून मिरजेतील पंढरपूर रोड स्मशानभूमीत आणण्यात आले. बेवारस मृतदेहांची विटंबना होते, याप्रकरणी महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी प्रभारी उपायुक्त सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सहाय्यक आयुक्त टीना गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर या पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती.
या समितीने सोमवारी सायंकाळी आपला सीलबंद अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालात आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असून, कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची दखल घेत आयुक्त कारचे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व मृतदेहांची विल्हेवाट लावणारा सफाई कामगार गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. तरसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांच्या दोन वेतनवाढी, तर मुकादम मिलिंद शिंदे यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
संघटना आक्रमक
मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी, त्याची सर्व पूर्तता पोलीस व सिव्हिल प्रशासनाने करावयाची आहे. या प्रकरणात सिव्हिलने विवस्त्र मृतदेह पालिकेच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पंचनामा केला नाही, की दफनावेळीही ते हजर नव्हते. त्यामुळे केवळ पालिका कर्मचारी दोषी आहेत असे नव्हे, तर जबाबदारी पोलीस व सिव्हिलची आहे. त्यासाठी आता शुक्रवारी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप शिंदे यांनी सांगितले.
सांगली, मिरज पोलिसांतील फरक
बेवारस मृतदेहाबाबत सांगली व मिरज पोलिसांतील फरकही अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना महापालिकेला पत्र देऊन शववाहिकेची मागणी करतात. मृतदेहाचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी तेथे हजर असतो. सांगली शहर पोलीस ठाण्यातील कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून पालिकेला पत्र दिले जाते. त्यात पालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावा, असे सांगून आपली जबाबदारी झटकली जात असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिका कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी
पोलिसांचे पत्र आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आर. के यादव यांना दूरध्वनीवरून दोन मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास सांगितले. यादव यांनी मुकादमाला, तर मुकादमाने सफाई कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरूनच हा आदेश दिल्याचे अहवालात उघड झाल्याने या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस, सिव्हिलकडून हेटाळणी
बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनाचीही जबाबदारी असते. या दोन्ही मृतदेहांबाबत पोलीस व सिव्हिलकडूनही निष्काळजीपणा झाला आहे. सिव्हिल प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह देताना ते कापडात गुंडाळून दिले नाहीत. बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी हजर राहणे अनिवार्य आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे; पण या प्रकरणावेळी एकही पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता. पालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत सिव्हिलकडे चौकशी केली असता, तुम्ही मृतदेह घेऊन जावा, पोलिसांना नंतर पाठवतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस व सिव्हिल प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसा अहवाल आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सिव्हिलच्या अधिष्ठातांना पाठविला आहे.