कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत, पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण प्रयोगशाळेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 05:08 PM2022-07-14T17:08:09+5:302022-07-14T17:11:36+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमणापूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली
भिलवडी : रसायनमिश्रित पाण्यामुळे मंगळवारी पलूस तालुक्यातील नागठाणे ते भिलवडीदरम्यान कृष्णा नदीपात्रातील लाखो मासे मृत झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आमणापूर येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेत पाठविले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ औताडे, क्षेत्र अधिकारी डॉ. रोहिदास मातकर यांनी भेट दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून नागठाणे ते आमणापूर, धनगाव, औदुंबर, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळ, सांगलीनदीपात्रातील लाखो मासे तडफडून मेले.
बुधवारी सकाळपासून नदीकाठी माशांची दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच दिवशी मासे कशामुळे मृत्युमुखी पडले, याचा छडा लावून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांकडे केली.
दरम्यान, नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामपंचायतींनी नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.